महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार, प्रारूप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ ही मतदार यादीसाठी अधिसूचित तारीख निश्चित केली आहे. या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच या निवडणुकांसाठी वापरली जाईल. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणांनुसार प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल.
या प्रारूप यादीवर हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदत आहे. सर्व हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.