Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

mosami kewat by mosami kewat
April 2, 2026
in article, राजकीय, सामाजिक
0
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

       

– धनंजय कांबळे 

महाराष्ट्राची ओळख प्रगतीशील, विवेकी आणि सामाजिक न्यायाच्या परंपरेशी जोडलेली आहे. पण सध्याच्या घडामोडी पाहिल्या, तर ही ओळख जाणीवपूर्वक गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. एका बाजूला इतिहासाचे विकृतीकरण करणारी वक्तव्ये, तर दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेच्या घटनांनी हादरलेला समाज. या दोन्ही गोष्टी एकाच काळात घडत आहेत, हा केवळ योगायोग नाही. ही संघी प्रवृत्तीची लिटमस टेस्ट आहे.

नथुरामी शरद पोंक्षेनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेबाबत केलेले विधान हे केवळ वैयक्तिक मत म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. कारण अशा प्रकारची विधाने ही समाजात संभ्रम निर्माण करण्याचा आणि इतिहासाच्या मूलभूत सत्यांवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न असतो. बाबासाहेबांसारख्या जागतिक स्तरावरील अभ्यासकाने मनुस्मृती जाळली, ती केवळ भावनिक प्रतिक्रिया नव्हती; ती अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेविरुद्धची जाहीर बंडखोरी होती. आत्मसन्मानाची लढाई होती. पण, बिनडोक आणि नालायक धर्मांध जातीवादी प्रवृत्तींना त्याचे मोल नाही.

महाड सत्याग्रह हा भारतीय सामाजिक क्रांतीचा मैलाचा दगड मानला जातो. तो केवळ पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता, तर मानवी हक्कांची पुनर्स्थापना करण्याचा निर्णायक टप्पा होता. त्या लढ्याच्या शताब्दी वर्षातही काही मंडळींना त्या क्रांतीची अस्वस्थता वाटते, हे वास्तव अधिक चिंताजनक आहे. जात वरकरणी संपली असे दाखवले जात असले तरी जात आजही जाणीव आणि नेणिवेत तितकीच घट्ट आहे जेवढी ती आधी होती.

विटाळ, शिवाशिव पाळली जात होती. केवळ एका पंगतीत बसून जेवण केल्याने जातिनिर्मुलन होत नाही, मनातून जाणीव नेणिवेतून जात समूळ नष्ट केली पाहिजे. दुसरी गोष्ट छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची आहे. इतिहास साक्षी आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकालाही उच्चवर्णीयांनी विरोध केला होता. त्या विरोधामागे सामाजिक वर्चस्व टिकवून ठेवण्याची मानसिकता होती. समाजात भेदाभेद निर्माण करणाऱ्या विचारसरणीला शास्त्रांचा आधार देण्याचा प्रयत्न तेव्हाही झाला आणि आजही होत आहे. त्यामुळे रायगडावरचे छत्रपती शिवराय आणि रायगडच्या पायथ्याशी असलेल्या महाडला सत्याग्रह करणारे, मनुस्मृती जाळणारे भीमराय हे दोन राजे तमाम भारतीयांच्या काळजावर अधिराज्य करीत आहेत.

इतिहासाची पाने चाळून पाहताना शूरवीरांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो. पण, याच परिवर्तनवादी महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी काही महाभागांनी घेतलेली आहे. महाराष्ट्रात सध्या भोंदू बाबा-बुवांच्या घटना घरादारात सगळीकडे चवीने चर्चिल्या जात आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीमुळे राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत समाजाने विवेकाने भोंदूबाबा आणि अशा विचारसरणीला पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर हल्लाबोल करायला हवा. जादूटोणा विरोधी कायदा लागू करून भोंदूबाबांना अद्दल घडविली पाहिजे. 

मात्र, आधीच घाबरलेले सरकारचे मंत्रीसंत्री स्वतःच व्हिडिओत दिसू लागले आहेत. उलट व्हिडिओ पाहिल्यास, फॉरवर्ड केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करू म्हणून जनतेला घाबरवत आहेत. अजूनही पेशवाईत असल्याप्रमाणे ते हुकूम सोडत आहेत. मात्र, आपण लोकशाही देशात राहतो याचे भान ठेवून स्वतःला राज्यकर्ते म्हणून घेणाऱ्या महाशयांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे हे विसरू नये.

खरातबाबाने मंत्रिमंडळातील नावे घेतली तर पळता भुई थोडी होईल म्हणून सोशल मीडियावर जे लोक याबाबत पुराव्यांसह पोलखोल करत आहेत, त्यांचे चॅनेल बंद करणे, त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करून सरकार मुस्कटदाबी करू पाहत आहेत. पण या पंतानी देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो हे कायम लक्षात ठेवावे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायचा अधिकार कुणालाही नाही, याची जाणीव ठेवावी.

दुसरीकडे पेज थ्री कलचरच्या झगमगाट देश अदानी अंबानींच्या इच्छेनुसार चालवला जात असताना मुंबईतील उद्योगपती मोहित कंबोज यांच्या आलिशान कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते. जे राजकीय लोक इतर वेळी एकमेकांवर तोंडसुख घेतात. तुटून पडतात. ते राजकीय लोक अशा कार्यक्रमांना जातात. नेते, अभिनेते हसतमुख सेलिब्रेशन करतात तेंव्हा ही केवळ सामाजिक शिष्टाचाराची बाब मानणे अवघड आहे. 

कारण एका बाजूला समाज अंधश्रद्धेच्या संकटाशी झुंज देत असताना, जगावर युद्धाची छाया असताना, गॅस सिलिंडरसाठी देश पुन्हा एकदा रांगेत थांबलेला असताना दुसऱ्या बाजूला सत्तेच्या वर्तुळात आनंदोत्सव साजरे होत असल्याचे चित्र जगाला नेत्यांचा बेबनाव दाखवत आहे. एकीकडे सत्तेत असलेले जबाबदार लोक बेजबाबदार वर्तन करीत असताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते जनतेला त्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देत एपस्टीन फाइल असेल, खरात फाइल असेल किंवा युद्धामुळे सुरू झालेली इंधन टंचाई असेल यावर आवाज उठवून जनतेला जागरूक करत आहे. महाराष्ट्रासह देशात घडत असलेल्या या सर्व घटनांकडे स्वतंत्रपणे पाहण्याऐवजी एकत्रितपणे पाहण्याची गरज आहे. इतिहासाचे विकृतीकरण, अंधश्रद्धेचा प्रसार आणि सत्तेभोवती फिरणारे आर्थिक हितसंबंध. 

या तिन्ही गोष्टी परस्परांशी निगडित आहेत. त्यामुळे सध्या देशात आणि राज्यातही ज्या पद्धतीने ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते अर्थात एपस्टीन फाइल, युद्ध व्हाया खरात फाईल्स उघड्या होत आहेत, ते पाहता महाराष्ट्राला जर खऱ्या अर्थाने प्रगतीशील ठेवायचे असेल, पुरोगामी ठेवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता,  विवेक आणि न्यायाच्या मूल्यांकडे परत पाहावे लागेल. अन्यथा, विचारांची ही लढाई केवळ शब्दांपुरती मर्यादित न राहता समाजाच्या मूळ संरचनेलाच हादरा देईल. कारण, आज आपण इतिहास विसरलो, तर उद्या इतिहासच आपल्याला माफ करणार नाही. जागते रहो…रात्रच नाही, तर दिवसही वैऱ्याचा आहे.


       
Tags: AndhashraddhaAnti Superstitionchatrapati shivaji maharajConstitution of IndiaDr Babasaheb AmbedkarequalityFreedom Of ExpressionGas Cylinder CrisisInflationJai BhimMahad SatyagrahaMaharashtraMaharashtra Progressive IdentityPhule Shahu AmbedkarPolitical CritiqueProgressive MaharashtraRationalismSocial JusticeStop History DistortionUnemploymentVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!
article

ढोंग, सोंग आणि भोंगळ राज्यकर्ते!

by mosami kewat
April 2, 2026
0

- धनंजय कांबळे  महाराष्ट्राची ओळख प्रगतीशील, विवेकी आणि सामाजिक न्यायाच्या परंपरेशी जोडलेली आहे. पण सध्याच्या घडामोडी पाहिल्या, तर ही ओळख...

Read moreDetails
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

April 2, 2026
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

April 2, 2026
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home