पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’साठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आणि उशिरा सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया यामुळे अनेक विद्यार्थी अर्जापासून वंचित होते. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनचे तसेच विद्यार्थी संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक बिघाड आणि शैक्षणिक सत्र उशिरा सुरू झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज भरता आले नाहीत. अकोला, नांदेडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सहायक आयुक्तांनी तसेच विद्यार्थी संघटनांनी मुदतवाढीची विनंती शासनाकडे केली होती.
विश्वगुरूच्या नादात मोदींनी भारताला मित्र ठेवला नाही, दोन-तीन महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान
स्वाधार योजनेची व्याप्ती आता तालुका स्तरापर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, मुदत संपत आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती होती. यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी (महाराष्ट्र प्रदेश), सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती या संघटनांनी समाज कल्याण आयुक्तालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून निवेदने सादर केली होती. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता प्रशासनाने आता ३१ डिसेंबरपर्यंत वेबसाईट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय नियमानुसार, ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागला आहे किंवा ज्यांची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशिरा पूर्ण झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. या अर्जांचा विचार शासकीय वसतिगृहातील उपलब्ध जागेनुसार केला जाईल.
अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी:
सुधारित अंतिम मुदत : ३१ डिसेंबर २०२५.
पात्र प्रवर्ग : अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध.
कुठे कराल अर्ज : सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर.






