निवडणुकीचा निकाल पाहता कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला बहुमत नाही. या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला देशातील दलित, वंचित समाजाच्या जनतेचा सहभाग व त्यांच्या मताचे मोलाचे योगदान आहे. देशातील दलितांच्याबाबतीत न बोलता केवळ महाराष्ट्रातील दलितांच्या राजकीय वाटचालीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सध्या दलित समाजातील नवीन पिढी नव्हे; तर जुनी फळी सुद्धा थोडीफार घाबरलेल्या स्थितीत दिसते. मात्र, या निवडणुकीमध्ये राज्यातील स्वतःला विद्वान समजणारे साहित्यिक आणि पुढाऱ्यांनी दलित मतदारांची दिशाभूल केली. त्यामुळे दलित, वंचितांनी वंचित बहुजन आघाडीला टाळून महविकास आघाडीला मतदान केले आहे. राज्यघटना धोक्यात असल्याचे सांगत महाविकास आघाडीने दलितांची मते आपल्या पदरी पाडून घेतली. परंतु, आपली लढाई अजून संपलेली नाही. काँग्रेसने सातत्याने दलित बहुजनांचे राजकारण उभे राहणार नाही याचीच रणनीती अवलंबली आहे. अगदी बाबासाहेब आंबेडकरांना देखील काँग्रेसने कधीच सत्तेत येवू दिले नाही. पण आपण निराश न होता स्वाभिमानाने पुन्हा आपली लढाई सुरू ठेवूया. आज आपल्या यश आलेले नसले तरी उद्याचा दिवस आपला आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागुया. आंबेडकरी विचार आणि घराण्याशी प्रमाणिक राहूया…
– ॲड. शांताराम मोरे, नागपूर
वंचित बहुजन आघाडीने मनाचा मोठेपणा दाखवून भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात 7 ठिकाणी विनाअट पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. त्यातील 3 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. मात्र, काँग्रेसकडे दिलदार आणि समजूतदारपणे निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने त्यांनी जाणीवपूर्वक अकोला मतदारसंघात उमेदवार देवून बाबासाहेब निवडणूक रिंगणात असताना जी खेळी केली, तीच खेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत केली आहे. त्यामुळे बाबासाहेब जे नेहमी म्हणत होते की, काँग्रेस हे जातीवाद्यांचे जळते घर आहे. ते आजही खरेच आहे. काँग्रेस सातत्याने बहुजन समाजाच्या राजकारणाच्या आड येत राहिली आहे. या निवडणुकीत देखील त्यांनी तेच केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या मतदारांना महाविकास आघाडीला मदत करण्याचे खुले आवाहन केले होते. त्यामुळेच दलित बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान केले आहे. नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बारामती इत्यादी ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत म्हणून वंचितने उमेदवार दिले नव्हते. त्याचा परिणाम म्हणून त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार घवघवीत मतांनी विजयी होऊन बीजेपी व एनडीएचे पानिपत झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीने माणुसकी व नैतिकतेचा खून करत अकोला येथे दलित समाजाची एकमेव प्रतिष्ठेची असलेली ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या जागेवर अकोला मतदारसंघात मदत करणे तर सोडून द्या तिथे प्रकाश आंबेडकर यांना पाडण्याचे काम महाविकास आघाडीने केलेले आहे हे आमच्या समाजातील विद्वानांना (ज्यांनी वंचितचा उमेदवार असूनही महाविकास आघाडीला मदत केली) समजायला हवे होते.
आमचे काही लोक या निवडणुकीच्या निकालामुळे आनंदी आहेत आणि एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अशा लोकांनी आपण “दुसऱ्यांना बाप म्हणण्यापेक्षा स्वतःच्या बापाला बाप म्हणणे योग्य राहील” हे लक्षात घेतले पाहिजे. “पाटलाचे घोडे- महाराला भूषण” या पद्धतीने दलित वागत आहेत. आपल्या हक्काचा सक्षम राजकीय पक्ष असताना आपण महाविकास आघाडीला का मदत करायची? एवढा साधा विचार या लोकांच्या मनात येऊ नये ही शोकांतिका म्हणायला हवी. ज्या लोकांना असे वाटते की, आमच्या पिढ्यान पिढ्या वाया जात आहेत पण आम्हाला सत्तेत येता येत नाही, त्यांनी केवळ सत्तेमुळेच समाजाचा विकास होतो का? याचे उत्तर शोधले पाहिजे. बाबासाहेब कधीच सत्तेत नव्हते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना कधीच सत्तेत येऊ दिले नाही, पण आपला विकास झाला नाही का? राजकीय ताकद ही निश्चितच मोठी असते, जो समाज सातत्याने सत्तेत असतो त्या समाजाचा झपाट्याने विकास होतो हे खरे आहे. पण बाबासाहेब म्हणतात की, राजनैतिक सत्ता ही अशी किल्ली आहे जी प्रत्येक कुलूप सहजपणे उघडू शकते, सगळ्या समस्यांचे निराकरण होऊ शकते आणि समाजाचा झपाट्याने विकास होतो. मात्र त्यासाठी आपल्या स्वाभिमानाला तिलांजली देणे बाबासाहेबांना कदापिही पसंत नव्हते, मान्य नव्हते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
समाजातील अशाच संधीसाधू लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतही काँग्रेसच्या मदतीने तसंच केलं आणि त्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती कांशीरामजी यांच्यासोबत आणि नंतर मायावती यांच्यासोबत सुद्धा काँग्रेसने खेळी करून पक्ष फोडण्याचे काम केले. महाराष्ट्रातील दलित वंचित समाज व नवीन पिढीने हा काँग्रेसचा कावा चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे. > @kash: काँग्रेस व त्यांच्यासोबतच्या इतर पक्षांना वंचितसोबत तसे करणे शक्य होणार नाही. कारण वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू व चाणाक्ष राजकारणी असल्याने काँग्रेसची डाळ शिजणे शक्य नाही.
वंचितांचा काँग्रेस किंवा त्यांच्या आघाडीला कोणताही विरोध नाही. मात्र, दलितांच्या वंचितांच्या संख्येनुसार जर सत्तेत वाटा मिळाला तर सत्ता संघर्ष करण्याची कोणतीही गरज नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा सत्तेमध्ये संख्येनुसार सारखा वाटा मिळण्यासाठीच लढा होता व आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातूनॲड. प्रकाश आंबेडकर यांचाही तोच लढा आहे हे विसरून चालणार नाही. जर आपण आपला स्वाभिमान विकून काँग्रेस व आघाडीशी तडजोड केली तर येणारा काळ हा आपणाला नष्ट करणाराच असेल याची जाणीव आजच्या युवकांना असणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने 1925 पासून सातत्याने पाठपुरावा करून बीजेपीला सत्तेपर्यंत नेले आहे.
त्यातून आपणसुद्धा शिकले पाहिजे. हताश न होता नव्याने परत उठून उभे राहून निस्वार्थ सेवा करून वंचित व ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून काम करण्याची जबाबदारी नवीन पिढीवर आलेली आहे.
ज्या दलितांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मदत केली, त्या दलितांचे उपकार ते जाणतील का किंवा त्यांना सत्तेचा काही लाभ होईल का याचा विचार यानिमित्ताने करावा लग्नात आहे. आजपर्यंतचा अनुभव आहे की अशा लोकांना कोणीच विचारत नाही. काल एका इतर मागास वर्गातील व्यक्तीला विचारलं की, जिथे महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला नाही मात्र तिथे वंचित किंवा बीएसपीचा उमेदवार असेल तेंव्हा तुम्ही वंचित किंवा बीएसपीला मतदान केले असते का? तर त्याचे उत्तर नाही होते. यावरून तरी आपण शहाणे होण्याची गरज आहे.
देशात दलितांच्या मताचा फायदा इतर लोक घेऊ शकतात. मात्र, दलितांच्या पक्षांना इतर लोक जे आरक्षणामध्येही आहेत ते सुद्धा मत देत नाहीत ही वस्तुस्थिती आमच्यातील विद्वान लोकांना समजत नाही? जे दलित नेते आरक्षणाचा फायदा घेऊन इतर पक्षांमधून निवडून येतात, ते खरंच ज्यांची मते घेऊन निवडून आले त्यांची सेवा करतात का? किंवा त्यांच्या पक्षात यांचे प्रश्न घेऊन गेले तर त्यांचं त्यांच्या पक्षश्रेष्ठींपुढे काही चालते का? तर उत्तर नाही असे आहे. जर अशा आरक्षित पदावर आरक्षित जागेवर निवडून गेल्यानंतर समाजाच्या कामी ते पडत नसतील तर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये भांडून आणि पुणे कराराचा संघर्ष करून दलित, अस्पृश्य व इतर मागास लोकांसाठी जे आरक्षण मिळवलं आणि भारत स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेमध्ये दलित अस्पृश्यांच्या आधी इतर मागासवर्गीय व इतर जातींना आरक्षण देऊन त्याचा समाजासाठी काय फायदा झाला? हा प्रश्न स्वतःला कधीतरी विचारून बघा. शिकलेल्या लोकांनी समाजाला फसवलं असे बाबासाहेब म्हणाले होते, ते दुर्दैवाने तंतोतंत खरे ठरत आहे.
काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीपर्यंत स्वतंत्र भारतात एकाही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून येऊ दिले नाही. संविधान सभेमध्ये त्यांच्यासारखा विद्वान संविधान पटू नसल्याने नाइलाजाने संविधान सभेत पाठवले होते. अशा काँग्रेस पक्षासोबत आमचे काही लोक इमाने इतबारे काम करतात व इतरांनाही प्रवृत्त करीत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ९५% फुले शाहू आंबेडकरी समाज प्रकर्षाने बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यासोबत इमानदार व खंबीरपणे उभा आहे, ही आंबेडकरी चळवळीची जमेची बाजू आहे, हे ध्यानात घ्या.
महाविकास आघाडीचे काही लोक म्हणतात की, वंचितमुळे आम्हाला दलितांची मते कमी मिळाली. मात्र, ही मंडळी सहजपणे विसरतात की, ज्या ज्या ठिकाणी वंचितने उमेदवार दिले नाहीत त्या त्या ठिकाणी वंचितच्या लोकांनी महाविकास आघाडीलाच भरघोस मते देऊन उमेदवार निवडून आणले. त्यामुळे वंचितचे मागच्या निवडणुकीतील प्रत्यक्ष मत मोजताना अप्रत्यक्षपणे कमी झालेले दिसतील. मात्र, ते मत कमी झालेले नसून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमध्ये जोडलेले आहेत हे समजून घ्या.
2024 च्या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने असे लक्षात आले की, राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एका हातात बाबासाहेबांचा फोटो तर दुसऱ्या हातात संविधानाची प्रत घेऊन संविधान वाचवा आणि इंडिया आघाडीला मतदान द्या म्हणत देशभरात प्रचार केला. राहुल गांधी यांनी दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणत त्यांचा फोटो वापरण्यापेक्षा आपल्या आजी आजोबा- वाडवडिलांच्या प्रतिमा वापरून मत मागायला हवे होते. त्यांनी तसं केलं नाही कारण त्यांना हे माहिती आहे की आता बाबासाहेब आंबेडकरांच्याशिवाय व घटनेशिवाय काँग्रेस इंडिया आघाडीलाच नव्हे; तर भारत देशाला दुसरा पर्याय नाही. त्यांची ही खेळी यशस्वी झाल्याचे दिसून येते. भाजपला रोखण्याची ही किमया केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे, राज्यघटनेमुळे वंचित दलित पीडित लोकांच्या मतांमुळे शक्य झाली, हे कोणीही मान्य करेल. > @kash: आमच्याकडे एक जमेची बाजू अशी आहे की, बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहेत आणि आपण सुद्धा आगामी निवडणुका भरघोस मतांनी निवडून येऊ शकतो यात कुणीही शंका घेण्याचे कारण नाही. निवडणुकीत हार- जित होतच असते. त्यामुळे हताश न होता नव्याने कामाला लागल्यास ज्या ठिकाणी आपल्या चुका झाल्या, त्या शोधून काढल्यास येणाऱ्या काळामध्ये आपले यश पक्के आहे. त्यासाठी समाजातील सुशिक्षित, नवमतदार युवक- युवतींनी राजकारणामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिरीरीने सहभाग घेणे अत्यावश्यक आहे. किंबहुना ते आजच्या पिढीचे आद्य कर्तव्यच आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर जे अनंत उपकार केलेत त्याची जाणीव ठेवून आपण सगळ्यांनी वंचित बहुजन समाजाच्या न्याय हक्काच्या लढाईत, चळवळीमध्ये तन- मन धनाने सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. या निवडणुकीत आपल्याला यश कले नाही, त्यामुळे आम्ही निराश आहोत पण आमची उमेद आजही कायम आहे. ही लढाई लांब पल्ल्याची आहे, पण अवघड नाही हे लक्षात घेऊया आणि आगामी निवडणुकांची तयारी करूया…आंबेडकरी विचार आणि घराण्याशी प्रामाणिक राहूया…विजय आपलाच आहे.
जय भीम..!