अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील खंडांबे गावात वंचित बहुजन आघाडीचे उच्चशिक्षित कार्यकर्ते सुजित संजय पवार यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल असूनदेखील आरोपींना अटक होत नसल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपींना तात्काळ अटक करून गाव दहशतमुक्त करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.
यावेळी प्रसाद भिवसने (जिल्हा महासचिव), जे. डी. शिरसाठ (जिल्हा सल्लागार), ॲड. योगेश गुंजाळ (युवा शहराध्यक्ष), प्रवीण ओरे (उपाध्यक्ष), राजीव भिंगारदिवे, राम शिंदे, सुजित पवार, अजित पवार, प्रदीप डहाणे, प्रशांत आल्हाट, प्रफुल्ल आल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.
८ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने “ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळणार नाही” असा आदेश दिल्याची माहिती सुजित पवार यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवली होती.
याचा राग मनात धरून आरोपी नितीन कदम, नितीन जंगम, गणेश पारे व भाऊराव उगले यांनी त्यांना शाळेजवळ बोलावून मारहाण केली. जातिवाचक शिवीगाळ करून “ॲट्रॉसिटी केस कर बघू, आमचे काय वाकड करतं ते बघू” असे म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. तरीदेखील आरोपी गावात मुक्तपणे फिरत आहेत व फिर्यादी तसेच त्याच्या मित्रांना धमकावत दहशत माजवत आहेत. आरोपींवर विविध गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर मोका कायद्यान्वये कारवाई करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.