खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धम्मपाल नेतनावरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले.
या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, तसेच २८ जुलै २०२५ रोजी खामगाव बंदची हाक देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जुलै २०२५ रोजी रोहन पैठणकर या बौद्ध समाजातील युवकाला गाय चोरीच्या कारणावरून निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी रोहित पगारिया, गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत संगेले यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करून पीडिताला न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली.
आज दुपारी बौद्ध समाजाचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमले आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पायी मोर्चाने तहसील कार्यालयाकडे प्रस्थान केले.
तहसील कार्यालयात पोहोचून आंदोलकांनी तहसीलदार खामगाव यांच्याशी चर्चा करून या संदर्भात निवेदन सादर केले.
याच ठिकाणी आंदोलकांनी २८ जुलै २०२५ रोजी खामगाव बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला असून, ते या निर्णयावर ठाम आहेत.
या निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवराव हिवराळे, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष दादाराव हेलोडे, ॲड. इखारे, ॲड. विश्वंभर गवई, आणि खामगाव ग्रामीणचे उपसरपंच शेख नदीम यांची प्रमुख उपस्थिती होती.