तिवसा : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने काटसूर गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृतदेहाची अवहेलना थांबवण्यासाठी गावासाठी स्वतंत्र व हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तिवसा येथील गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आले.
तिवसा तालुक्यातील काटसूर हे बौद्ध समूहाच्या वस्तीचे अल्प लोकसंख्येचे गाव आहे. मात्र प्रशासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने ग्रामस्थांना आजही प्राथमिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना काटसूर गावात मात्र मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी हक्काची जागा उपलब्ध नसणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
सध्या रस्त्याच्या कडेला किंवा इतरांच्या शेतजमिनीत अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सागर भवते यांनी आक्रमक भूमिका घेत गावकऱ्यांसह गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन तातडीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

निवेदन सादर करताना उपसरपंच सिद्धार्थ कटारने, जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, तालुका अध्यक्ष मनीष खरे, महासचिव अमोल जवंजाळ, उपाध्यक्ष राजकुमार आसोडे, नितीन थोरात, योगेश भांडारकर, सागर गोपाळे, स्वप्नील पाटील, प्रणय कापसे, प्रशिक कापसे, प्रमोद गजरे, सविता कटारने, नलिनी अढाऊ, शांता कापसे, अलका कापसे, सविता कापसे, सुमन हेंडवे, हिरु गजरे, वंदना कापसे, सुरज बन्सोड यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सागर भवते यांनी तीव्र शब्दांत भूमिका मांडताना सांगितले की, तिवसा मतदारसंघात विकासाच्या गप्पा करणाऱ्या आजी-माजी लोकप्रतिनिधींना ७८ वर्षांतही स्मशानभूमी उभारता आली नाही. काटसूर हे बौद्ध समाजाचे गाव असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षातून जातीय भेदभाव होत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्राथमिक स्वरूपात निवेदन देण्यात आले असून दहा दिवसांत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध न झाल्यास अनोख्या पद्धतीने प्रशासनाची ‘अंत्ययात्रा’ काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.





