या लेखा च्या शीर्षकाची प्रेरणा भारतातील एक ख्यातनाम चित्रकार नीलिमा शेख ह्यांच्या एका मोठ्या ‘कॅनवास वरील पेंटिंग्सच्या मालिकेवरून मिळाली. नीलिमा शेख बडोद्यात स्थाईक आहेत. ह्या कॅनवास पेंटिंग मालिकेचा प्रारंभ त्यांनी २००३ साली केला आणि २०१० साली पूर्णत्वास आली.ही पेंटिंग्स जगभरातल्या विविध कला महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत आणि त्यानंतर २०१७ साली प्रसिद्ध डॉक्युमेंटरी दिग्दर्शक अविजीत मुकुल किशोर ह्यांनी नीलिमा शेख आणि ह्या चित्रमालिकेवर वर आधारित एक चित्रपट बनवला. ही सर्वच पेंटीग्स अप्रतिम सुंदर आहेतच आणि त्यात तुम्हाला लघु शैलीतील (मिनिएचर) आकृत्या पाहायला मिळतील, काश्मिरी विणकामा ची झलक दिसेल आणि १३ व्या शतकातील गूढ कवियत्री लाल देड आणि विसाव्या शतकातील अमेरिकन काश्मिरी कवी आगह शाहिद अली यांची छाप ही आढळून येईल. अविजित मुकुल किशोर यांनी काश्मीर मधील दैनंदिन जीवनावरील डॉक्युमेंटरी फुटेज, सुंदर लँडस्केप्सचे अमूर्त चित्रण आणि नीलिमा शेख त्यांच्या पेंटिंग्सचे क्लोजअप याची अनोखी गुंफण केली आहे. जेव्हा काश्मीर च्या सुंदर व शांत वाटणाऱ्या निसर्गाचे चित्रण नीलिमा शेख ह्यांचा दुःख, हिंसा आणि गमावलेले जीवन अधोरेखित करणाऱ्या चित्रकले च्या जोडीने दिसते, तेव्हा प्रेक्षकांकडून एक तीव्र प्रतिक्रिया उमटते.
या लेखात काश्मीर प्रश्नाबाबत सखोल चर्चा करण्याचा माझा मानस नाही. त्या बद्दल ची माहिती आपणा सर्वांना आहेच, भले ती पुरेशी नसेल. ५ ऑगस्ट २०१९ दिवशी काश्मिरी लोकांचे संविधानिक हक्क कसे निर्लज्जपणे हिरावून घेण्यात आले, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. मागच्या वर्षी करोना व्हायरस च्या निम्मिताने ‘लॉक-डाउन’ नेमकं काय असत हे आपल्याला अनुभवायला मिळालं आणि नेहमीच लॉकडाउन सदृश परिस्थितीत राहायला लागणाऱ्या काश्मिरी जनतेचे काय हाल होत असतील, ह्याचे थोडेतरी अनुभव आपल्याला मिळाले पण तरीही, ‘आपल्या’ आणि ‘त्यांच्या’ लॉक -डाउन मध्ये फरक होताच. लॉकडाउन मध्ये जेव्हा उर्वरित भारत ‘Netflix’ वर वेग-वेगळ्या चित्रपटांचा आनंद घेत होता, तेव्हा मात्र काश्मीर मध्ये ना इंटरनेट सेवा उपलब्ध होत्या, ना टेलीफोन सेवा. काश्मिरी मुलांसाठी कुणीच ‘ऑनलाईन क्लास’ घेतले नाहीत आणि दहशतीचे वातावरण कायम ठेवत काश्मीर च्या गल्ली-गल्लीत बंदुकी घेऊन सुरक्षा कर्मी सतत घिरट्या मारतच होते.
‘पराकोटीच्या दुःखाचा आणि हिंसेचा अनुभव घेतलेली व्यक्ती एखादी सुंदर कलाकृती निर्माण करू शक्तो का?’ हा मला पडलेला प्रश्न जर्मन तत्वज्ञ थिओडोर अडोर्नो यांनी अनेक वर्षांपूर्वी उपस्थित केला होता हिटलर काळखंडातील ज्यू वंशीय लोकांची सामूहिक कत्तल अडोर्नो ह्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली, तेव्हा त्यांच्या ओठातून फुटलेले शब्द म्हणजे – ” Auschwitz मधील ज्यू मानवसंहारानंतर नंतर कविता लिहिण्याचा विचार सुद्धा पाशवी व अनैतिक वाटतो “. नाझी जर्मनीत Auschwitz’ येथील छळछावणीत तब्बल १० लाख पेक्षा जास्त ज्यू व्यक्तींची कत्तल करण्यात आली होती. अडोर्नो ह्यांच्या ह्या उद्गारांनंतर बऱ्याच विचारवंतानी आणि कलावंतांनी प्रतिक्रिया देत, कलात्मक दृष्ट्या व्यक्त होण्याच्या नवीन पद्धती निर्माण केल्या, ज्याने करून जगात होणाऱ्या क्रूर घटनांचे योग्य प्रतिबिंब व सादरीकरण कलाविश्वात साकारले जाईल.
ज्या प्रमाणे भारत आणि पाकिस्तान दोघांना आजून ही फाळणी च्या आठवणींनी ग्रासलेले आहे त्याचप्रमाणे ज्यू मानवीसंहाराच्या धक्क्यातून अजून ही युरोप सावरलेला नाही. १९७६ साली, अमेरिकन लेखक चार्ल्स रेझनीकॉफ, ह्यांनी जणू-काय अडोर्नो ह्यांना उद्देशूनच एक कवितासंग्रह लिहिला, ज्याचे नाव त्यांनी ‘Holocaust’ (ज्यू मानवसंहार) ठेवले . रेझनीकॉफ ह्यांचा जन्म १९व्या शतकात, मूळ रशियातल्या ज्यू धर्मीय आई-वडिलांच्या पोटी झाला, त्यांनी नंतर अमेरिकेला स्थलांतरण केले. रेझनीकॉफ ह्यांनी न्यूयॉर्क विद्यापीठात विधी व कायद्याचे शिक्षण घेतले. रेझनीकॉफ ह्यांनी कधीच वकील म्हणून काम केले नाही, पण त्यांच्या कवितांमध्ये तुम्हाला कायदेशीर पद्धतींची झलक दिसते. रेझनीकॉफ ह्यांचा मते कविता ही केवळ स्वतःच्या भावनांना वाट करून द्यायचे साधन नसून, ज्या पद्धतीने एखादा साक्षीदार न्यायालयात पाहिलेल्या- ऐकलेल्या- अनुभवलेल्या घटनांचे पुरावे देतो, त्याचप्रमाणे कविता ही आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या घटनांचे व्यवस्थित मांडण्याचा मार्ग आहे.
‘गार्डन ऑफ फरगॉटन स्नो’ ह्या कलाकृतीत, नीलिमा शेख ह्या स्वतःच्या अनुभवांमधून अर्डोनो यांच्याप्रमाणेच निर्माण झालेल्या द्विधा मनस्थितीला उत्तर देतात. नीलिमा शेख ह्या ‘बडोदा कलाकार समुहा’ चा भाग होत्या, महाराजा सयाजी गायकवाड विद्यापीठातल्या कला विभागात बडोदा कलाकार समूहाची सुरवात १९५७ साली एस. के बेंद्रे यांनी केली. बडोदा समूहाची खासियत म्हणजे त्यांनी एकीकडे वसाहतवादी कला पद्धती ह्यांचा धिक्कार केला तर दुसरी कडे बंगाल – शांतिनिकेतन कालसमूहा चा कलात्मक-राष्ट्रवाद ही पूर्णपणे स्वीकारला नाही. बडोदा कालसमूहाने प्राचीन भारतीय सांस्कृतीक व कला परंपरामधे रुजलेल्या पण आधुनिक भारतीय कलात्मकतेला प्राधान्य दिले. बडोदा कलाकार समूह चे इतर मान्यवर म्हणजे के.जी. सुब्रम्हण्यम, गुलाम मोहम्मद शेख, विवान सुंदरम, भूपेन खाकर, रेखा रोडवत्तीया व ज्योत्स्ना भट्ट. स्वत: नीलिमा शेख यांचा भारतीय परंपरेतील विणकाम आणि सूक्ष्म-कलाकृतींचा खोल अभ्यास होता. नीलिमा शेख यांना कनिष्ट आणि वरिष्ठ कला हा भेद मान्य नाही. शेख ह्यांच्या मते , एरवी कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या ‘हस्तकला’ उद्योगांनी विविध कला पद्धती फक्त जिवंत नाही ठेवल्या, तर कलेला मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवले. जेव्हा नीलिमा शेख स्वतः ची कलाशैली निर्माण करत होत्या, तेव्हा त्यांना वेग-वेगळ्या कलाशाखांमधील भिंती आणि भेदभाव दूर करण्याची तीव्र गरज भासली. हस्तकलेत सजावट असते म्हणून त्याला कलात्मक मूल्य नाही ह्या प्रकारची विधाने नाकारण्याची पण गरज आहे. जे पहिले आहे, जाणवले आहे ते व्यक्त होण्याची आणि त्याला दृश्यमान करण्याची गरज त्या मांडतात.
फिल्म मधील एक दृश्य लक्षवेधक आहे. जेव्हा दिग्दर्शकाचा कॅमेरा शेख ह्यांच्या कलाकृतींवरून फिरत, कलाकृतीचे बारकावे आपल्या समोर आणत असतो , तेव्हा प्रेक्षकांच्या कानावर सलमान रश्दी लिखित ‘ शालिमार, द क्लाऊन’ ह्या पुस्तकातील काही ओळी पडतात –
” अशा काही गोष्टी आहेत,
ज्यांच्या कडे अप्रत्यक्षच बघायला हवे,
कारण ते थेट बघितल्यास, तुम्ही दृष्टी-हीन होऊ शकता
सूर्या च्या तळपत्या तेजा प्रमाणे ….
पाचीगाम नावाचं एक गाव ,
अस्तित्वात होतं काश्मीर च्या नकाशावर,
पण त्या दिवशी,
त्या गावाचं अस्तित्व इतर कुठेच उरले नाही,
आठवणींचा अवकाश सोडून.”
ही कविता जेव्हा फिल्म मध्ये ऐकायला येते, त्या वेळेस नीलिमा शेख ह्यांची एक कलाकृती पडद्यावर झळकते, ज्यात दोन बायका आपल्याला दिसतात. एक बाईने तिचे डोळे हातानी झाकून घेतले आहेत, तर दुसरी बाई डोकं वळवून दूर काही तरी पाहत आहे. अशी काय गोष्ट आहे जे बघून पहिल्या बाईने तिचे डोळे झाकून घेतले ? आणि दुसरी बाई नक्की कुणावर लक्ष्य ठेवून आहे ?
काश्मीर, आता राज्य राहिलेले नाही , तर एक केंद्र-शासित प्रदेश बनले आहे. काश्मीर चा इतिहास पूसून टाकण्यात आला आहे आणि आता मुंबई-गुजरात येथील व्यापारांसाठी काश्मीर मधलं रान मोकळे झाले आहे. हे व्यापारी आता काश्मीर ला एक ‘ व्यावसायिक आणि पर्यटन केंद्र’ बनवायच्या प्रयत्नात आहेत. ही प्रक्रिया चालू असताना, आपल्या पैकी प्रत्येकानी काश्मीर ला आपल्या स्वप्नात अवतारु द्यावे आणि आगा शाहिद अली ह्यांच्या ‘अलविदा’ (Farewell) ह्या कवितेचे शब्द आठवावेत.