कोलंबो: भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला आहे! कोलंबोमध्ये झालेल्या रोमांचक फायनलमध्ये आपल्या दमदार खेळाच्या बळावर भारतीय महिला ब्लाइंड क्रिकेट संघाने नेपाळचा सात विकेट्सने पराभव करत वर्ल्ड कप किताब आपल्या नावे केला आहे.
या विजयाने भारताचे केवळ वर्चस्वच सिद्ध झाले नाही, तर संपूर्ण स्पर्धेत संघाने एकही सामना न गमावता, अजिंक्य राहून ही ट्रॉफी जिंकली आणि आपला दबदबा कायम ठेवला.
भारताने टॉस जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. नेपाळने २० षटकांत ५ गडी गमावून ११४ धावा केल्या. हे आव्हान भारतासाठी फार मोठे नव्हते आणि आपल्या फलंदाजांनी ते सहज पार केले. भारताने हे लक्ष्य केवळ १२.१ षटकांतच पूर्ण केले, म्हणजे विजयासाठी अजून ४७ चेंडू शिल्लक होते!
भारताच्या विजयाची खरी शिल्पकार ठरली ती फुला सरेन. तिने केवळ २७ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ४४ धावांची धडाकेबाज खेळी करत टीमला सहज विजय मिळवून दिला.
या सामनात करुणा के. हिनेही २७ चेंडूंवर ४२ धावांची (विस्फोटक खेळी केली. यांच्याव्यतिरिक्त, बसंती हांसदा १३ धावांवर नाबाद राहिली आणि तिने संघाला विजयापर्यंत पोहोचवले. या धावांचा पाठलाग (रन चेज) करताना भारताने फक्त ३ गडी गमावले.
भारतीय महिलांचा सुवर्णकाळ!भारतीय महिला क्रिकेटसाठी हा काळ सुवर्णयुगापेक्षा कमी नाही! मुंबईत २० दिवसांपूर्वीच भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत महिला क्रिकेटचा नवा अध्याय सुरू केला होता.





