20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृती जाळली. तिही त्यांचे समतावादी ब्राह्मण सहकारी मा. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते! या मागे खूप मोठे सत्य दडलेले आहे. यात ब्राह्मण समूह विशेषत: पुरोगामी ब्राह्मण व्यक्तिंची मोठी ऐतिहासिक जबाबदारी आहे. मनुस्मृती न वाचताही सर्वांच्या डोक्यांतील हे कल्पना-संस्कार हळूहळू का होईना समूळ घालविण्यासाठी त्यांच्याच मुखांतून सांगण्याची आता गरज वाटत आहे.
लाख खंडाळा (ता. वैजापुर, जि.औरंगाबाद) गोदावरी खोर्यातील एक गांव. 2011 च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 2,014, तर बौद्धांसह अनुसूचित जातींची लोकसंख्या 5.% आणि अनु. जमातीची लोकसंख्या 9.28% आहे. बाकी सारे मराठा-माळी-ओबीसीतील समाज आहेत. गावातील बहुसंख्य शेतकरी कुटुब आपापल्या शेतात कोपी (घर) करून विहीरीच्या पाण्यावर हंगामी बागायत शेती करत आहेत. बांधाला बांध लागलेली दोन शेतकरी कुटुंब. बौद्ध समाजातील बाळासाहेब अलकाबाई गायकवाड आणि माळी समाजातील देविदास देवकर एकमेकांसोबत एकत्र जेवत होती असे जवळीकचे संबंध असलेली ही दोन कुटुंब.
काही दशकापूर्वी एवढी कमी संख्या असतानाही गायकवाडांनी लाख खंडाळा गावचा सरपंच बौद्ध समाजातून निवडून आणला होता. आधीपासून गावची यात्रा, होळीला गायकवाड कुटुंब वर्गणी देत होते. पण, अचानक मागील काही वर्षांपासून ही वर्गणी घेणे (देणे नाही!) बंद करण्यात आल्याचेही समजले. गायकवाड यांचा थोरला सज्ञान मुलगा अमोल (वय 22) वैजापूरला केटरिंगचे काम करून घराला हातभार लावत होता. 12 मार्चला तो या कामाला चालल्याचे सांगून गेला. तो नंतर परत आलाच नाही. त्यानंतर देवकरांनी त्यांच्या 24 वर्षाच्या सज्ञान मुलीला अमोलने पळवून नेले असा आरोप केला असल्याचे समजले (सज्ञान तरुण-तरुणी एकमेकाला पळवतात कसे?) आणि देविदासचा मुलगा सागर याने गायकवाड कुटुंबाला जिवे मारण्याची तक्रार वैजापूर पोलिसांसह पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे केली होती.
13 मार्च रोजीच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन पोलिसांनी हालचाल करून सार्या प्रकरणाचा तपास करायला हवा होता. ते झाले असते तर पुढच्या हत्या टळल्या असत्या. त्यामुळे गायकवाडांना संरक्षण द्यायला हवे होते. ते बाजूलाच राहिले. उलट पोलिसांनीच गायकवाडांना तुमची पोरगी असती तर तुम्ही काय केले असते? असा प्रश्न तोंड वर करून विचारले आणि त्यांना गप्प बसवल्याचेही कळले आहे! इथूनच पाणी मुरत असल्याचे दिसते! त्यातच ते दोघे तरुण-तरुणी कुठे आहेत याचा अजून पत्ताच नाही. देवकर कुटुंबातील घरच्या सर्व स्त्रिया, अन्य माणसं, बकर्या आदी सारे काही कोपीतून हलविण्यात आले होते. घरी कुणीच राहत नाही असे अस्ताव्यस्त चित्र तेे निर्माण केले होते! तेे फक्त बकरीच्या लेंड्या, कांद्याची फोलफाटे आणि माती पडलेली दाखविली होती. सारा बनावच अधिक वाटत होता! या पार्श्वभूमीवर 14 मार्च, 2020 रोजी रात्री देविदास देवकर आणि त्यांचा धाकटा भाऊ रोहिदास देवकर काळोखात गायकवाड यांच्या घरी आले. त्यांनी गायकवाड उभयता नवरा-बायकोला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर अमोलचा भाऊ भिमराजच्या मानेवर घाव घालून ठार मारण्यात आले. हे सारे पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे घडले होते यात शंकाच नाही! म्हणून लाख खंडाळातील सार्या आरोपींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट त्यातील मुख्य कलमांसह खटला भरावा व तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवायला हवा. मात्र, सातेगाव-मराठवाडा, खैरलाजींसह अनेक प्रकरणात सारे आरोपी निर्दोष सुटले आहेत. तसे इथेही घडू नये. त्याचप्रमाणे मनुस्मृतीचा, ब्राह्मणी मानसिकतेचा नंगा नाच कसा रोखायचा यावर समतावाद्यांनी गंभीरपणे विचार करायला हवा.
देशभर उलथापालथ घडविलेल्या दिल्ली निर्भयाच्या आरोपींना फाशी द्यायला सात वर्षांहून अधिक काळ लागला. गायकवाडांकडे उरलेल्या ज्येष्ठ कुटुंबीयांचे पुनर्वसन करून कायम विकलांग होणार्यांना न्याय मिळायला हवा.
मुंबईत वडाळाच्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये स्थापन झालेल्या दलित पँथर पूर्व दलित आघाडीच्या काळात व खूप गाजलेला बावडा बहिष्कार (ता. इंदापूर, जि. पुणे) इथपासून ते नामांतर ठरावानंतरचा मराठवाड्यातील अभुतपूर्व हिंसाचार, या काळात बौद्धांसह मातंग समूहावर झालेले अत्याचार, उस्मानाबाद-लातूर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, रायगड इ. जिल्ह्यांतील कितीतरी प्रकरणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तर तत्कालीन भारिप आणि भूमीहीन हक्क संरक्षण समितीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत 1986 पासून पूर्वेकडील चंद्रपूर, भंडारा-गोंदीया, यवतमाळ, अकोला-वाशिमपासून पश्चिमेकडे धुळे-नंदुरबार येथील वन जमीन कसणार्या चिंचपाणी गावातील आदिवासींवर अत्याचार झाले होते. एका झोपडीतील बाळंत स्त्रिला त्रास देत होते. त्यावेळी प्रचंड चिडलेल्या आदिवासींनी त्या न ऐकणार्या वन कर्मचार्याला पेट्रोल टाकून जाळले होते. तेेथे आम्ही जाऊन आलो. काही लेखही लिहीले. तेव्हा शिवसेना, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, भाजप सार्यांचे बौद्ध, दलितांविरोधात कसे समान हितसंबंध एकवटले होते ते पाहिले! तेेथे यांचा गाव स्वतंत्रच! तेव्हापासून पार आतापर्यंतही तेच पहात आहे. आताची महाआघाडी जरी भाजपविरोधी दिसत असली; तरी ही दुसरी कुठली आघाडी नसून ती पूर्वीपासूनची सनातन ब्राह्मण-क्षत्रिय युती आहे! त्यावेळी गावोगावची काँग्रेस-सकाँ पुढार्यांची मुलं शिवसेना-भाजपकडे पाठविण्यात आले होते आणि ते गावागावातील दोन्ही काँग्रेसवर वैतागलेले ओबीसी-बौद्धेतर दलित यांना शिवसेनेच्या नावाने संघटीत करीत होते! आता कुठे सेनेमध्ये ओबीसींची दुसरी-तिसरी पीढी पुढे येत असतानाच आता फक्त नाव बदलून परत सराईत दोन्ही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे पद दाखवून त्यांच्याच पारंपरिक सत्तेचे जाळे टाकले आहे आणि त्यांची सारी कामं करून घेत आहेत!
बौद्ध, दलित, भटके-विमुक्त यांच्या हत्यांकाडांचे अत्याचारांचे कॉरिडर म्हणून सोशल मीडियात उल्लेख करण्यात आला आहे; ती आताची खर्डा, सोनई, जामखेड, सोनेगावचे बबनभाऊ मिसाळ खून प्रकरण, खैरलांजी आदी सर्व प्रकरणांत आणि एखादे अनुसूचित जातीतील युवकांनी केलेले कोपर्डी प्रकरण; या सर्व प्रकरणातील तपशिल काहीही असला तरी प्रत्यक्ष मनुस्मृती न वाचताही तिच्या हजारो वर्षांच्या विद्वेषी, हिंसक, विषमतावादी ब्राह्मणी संस्कारांचा (फारच कमी अपवाद सोडून) सर्वांच्या डोक्यांवर खूपच मोठे अधिराज्य आहे. नवनवे तंत्रज्ञान, जागतिक पातळीवरील भांडवलशाही – वैश्विकीकरणाच्या स्थितीमध्येही डोक्यातील ही ब्राह्मण-पुरोहित वर्णाचे श्रेष्ठत्व-पावित्र्य ही कशी-कोण-कधी करणार हा आजवरचा सर्वांत मोठा प्रश्न आहे.
20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या वेळी मनुस्मृती जाळली. तिही त्यांचे समतावादी ब्राह्मण सहकारी मा. सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते! या मागे खूप मोठे सत्य दडलेले आहे. यात ब्राह्मण समूह विशेषत: पुरोगामी ब्राह्मण व्यक्तिंची मोठी ऐतिहासिक जबाबदारी आहे. मनुस्मृती न वाचताही सर्वांच्या डोक्यांतील हे कल्पना-संस्कार हळूहळू का होईना समूळ घालविण्यासाठी त्यांच्याच मुखांतून सांगण्याची आता गरज वाटत आहे. हे श्रेष्ठत्व-पावित्र्य आमच्यात नाही. हे वैज्ञानिक नाही. राज्य घटनेच्या मूळ गाभ्याच्या अगदी विरोधातील आहे. मूंज, घरभरणी, विवाह अगदी जन्मल्यापासून पार मृत्यूनंतरचे सारे ब्राह्मणी-वैदिक विधी यात येतात. परदेशात गेलेल्या कुटुंबांसाठी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर या सार्या विधींच्या सिडीज, युट्युब आदी साहित्य मोठ्या प्रमाणावर पाठविल्या जात आहेत. नवीन तंत्रज्ञानाबरोबर हे ब्राह्मण-पुरोहितांचे वर्चस्व-पावित्र्य भारताबाहेर जगभर जात आहे. हा कशाचा प्रभाव आहे? यासंदर्भात मार्क्स, एंगल्स-लेनिनचा समाजाचा पाया आणि वरचा मजला या संदर्भात आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक-स्त्री-पुरूष विषमादी हितसंबंध यांची कित्येक दशकातील चर्चा करण्याची ही जागा नाही. पण, स्वातंत्र्यानंतर आज 73 वर्षांनंतरही काही मोजक्या व्यक्ती-कुटुंब आणि बौद्ध समूह सोडल्यास ब्राह्मणी वर्चस्व झुगारलेला अन्य कोणताही एक जाती-समूह नाही.
याच वास्तवामुळे अशी आंतरजातीय-धर्मिय प्रेम प्रकरणे-विवाह, फुले-आंबेडकरवाद्यांचे सामाजिक-सत्ताकारण पटत आहे. त्यातूनच महिला, बौद्ध, दलित, भटके-विमुक्त, आदिवासींवरील अत्याचार होत आहेत. नाहीतर एकाच ताटात जेवणार्या गायकवाड-देवकर या दोन कुटुंबातील देवकर परिवार गायकवाडांचे कुटुंब उद्ध्वस्त करेपर्यंत का गेला? लिंबोणी (तत्कालीन ता. अंबड, जि. जालना) येथील भूमिमहीन बौद्ध स्त्रिया गायरान जमीन वहित करत असतानाच त्यांच्याविषयी कधीही राग नसलेल्या माझ्या ओळखीच्या एका मराठा शेतकरी तरुणाने काही तरुण मित्रांसोबत त्या स्त्रियांना गायरानमध्येच मारून टाकले. त्या तरुणाच्या डोक्यात आधी कधीही न दिसलेला हा इतका टोकाचा खुनशी विद्वेष कसा, कुठून आला? मातंग समाजातील तरुण कार्यकर्ते बबनभाऊ मिसाळ (पं. स. सभापती, जामखेड) यांच्या डोक्यावर भला मोठा दगड घालून चक्काचूर का, कुणी केला? तेच खैरलांजी, डोंगरगांवच्या आई-मुलगीचा खून, लाख खंडाळ्याची परवाची घटना. सर्वांच्या डोक्यांत स्त्री शुद्रातिशुद्रांविरुद्ध एवढा अतिरेकी राग कुठून, कसा येतो? हा विद्वेष कोणी पेरला? या आशयाचे उत्तर फक्त आणि फक्त मनुस्मृती या ब्राह्मणी, विद्वेषी ऐतिहासिक ग्रंथातच दिसते आणि याच्या समर्थनाची भूमिका आज फक्त संघ परिवारच करताना दिसत आहे. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रास्वसं) सरसंघचालक मोहन भागवत यांनी 6 जानेवारी, 2013 रोजी इंदूर येथे सभेत भाषण केले होते. ते म्हणाले होते, महिलांनी फक्त गृहिणी असाव्यात आणि पतींनीही तिला बक्षीस दिले पाहिजे. ते आणखी पुढे म्हणाले, पती आणि पत्नी एका सामाजिक कराराने बांधलेले आहेत. जर स्त्री आपली कर्तव्ये पार पाडण्यात अयशस्वी झाली तर तिला सोडून दिले जाऊ शकते. 93 वर्षांपूर्वी बाबासाहेब आणि सहस्त्रबुद्धेंनी मिळून जाळलेल्या मनुस्मृतीची ही जिवंत ब्राह्मणी स्मारके सर्वत्र फिरत आहेत. बोलत आहेत. या विरुद्ध सर्वत्र जोरदार प्रतिक्रिया येताच संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी थोडे सावरायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण, ‘बूंदसे गयी वो हौदसे नही आती’! भागवतांची ही भूमिका राज्यघटनेविरुद्ध आहे. सर्व स्त्रीशुद्रातिशुद्रांचा अपमान करणारी आहे. त्यामुळेच 2014 नंतर केंद्रात सत्ता येताच अधिक चेकाळलेले संघ-भाजप परिवारातील नेते-मंत्री सर्रास स्त्रिया-पूर्वास्पृश्य दलित-मुस्लीम-बौद्ध आणि राज्यघटनेविरुद्ध सतत विष ओकत सुटले आहेत! मनुस्मृती तर या विद्वेषी ब्राह्मणी भूमिकेविषयीच पूर्वापार बोलत आहे आणि ती न पहाणार्या, वाचणार्या बहुसंख्यांकांच्या डोक्यात भागवतांसह त्यांचे मूठभर संघीय, शाखीय ब्राह्मण जिवंत ठेवत आहेत आणि अशा बहुसंख्य समूहातील युवकांची डोकी भडकवीत आहेत. खून पाडत आहेत. त्यांना गुन्हेगार बनवत आहेत! म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या न झालेल्या ऐतिहासिक भाषणाच्या Annihilation of Castes (जातीव्यवस्थेचे निर्मूलन) या ग्रंथात डोक्यातील ही notion (भावना-कल्पना) घालविणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. शाळा कॉलेजेसमधील एखाद-दुसरा शिक्षक सोडल्यास सारे आणि सारी अभ्यासक्रमाची पुस्तके, साहित्य, आचार-विचार-रंग ही सारी ब्राह्मणी विचारांनी खच्चून भरलेली आहेत. पहिल्या पानावरील संविधानातील प्रस्ताविका ही नावापुरतीच राहते. बिगर संघीय समूहातील निवडक माणसे यांच्यावर प्रभाव टाकण्यास आज तरी अपुरी पडत आहेत. सारी सरकारं, व्यवस्था ब्राह्मणी विचार-मूल्यांनी काठोकाठ भरलेले आहेत. ती इतकी की, नवीन मीडियाही या विचारांनी पोखरला जात आहे. त्याचा फक्त एकच नमुना येथे देत आहे.
आजही वेबसाईटसवर Which is the most dangerous caste in India? (भारतातीय सर्वाधिक धोकादायक जात कोणती?) असा प्रश्न टाकलात तर खालील उत्तर मिळते. Caste is not dangerous. Brahmins will remain the undisputed upper castesand others will be backward. Nobody can, not even God can change this equation. मात्र येथे सारे राज्यघटना समर्थक खूप दमदारपणे सोशल मीडियावर उतरले आहेत. या ब्राह्मणी प्रचार यंत्रणेबरोबर जोरदार टक्कर देत आहेत. त्यावरही मोठी बंधनं आणण्याचा संघ-भाजप सरकारं अटोकाट प्रयत्न करत आहेत. मनुस्मृती न वाचता, न पाहता कोण, कुठे, कसा जोपासतो? हे जरा सर्व परिवर्तनवाद्यांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.
संपर्क : 9421661857