अकोला : हातरुण येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित रॅलीदरम्यान विजेचा धक्का लागून एका तरुण बौद्ध अनुयायाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा तरुण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रॅलीदरम्यान डीजेच्या गाडीचा लोंबकळणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने सात जणांना विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत अविनाश जानराव डोंगरे (वय २५) यांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी नगरसेवक पराग गवई, जय तायडे, नागेश उमाळे आणि शुभम नाईक यांच्यासह रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची विचारपूस केली. तसेच, मृत तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.





