अहमदनगर : पाटेवाडी खंडोबा वस्ती येथील आदिवासी समाजातील बीबी शाईनास पवार यांचे निधन झाले. गेल्या पन्नास वर्षांपासून हे कुटुंब या वस्तीमध्ये राहत असून मजुरी करून उपजीविका चालवत होते. मात्र, शासकीय जागेत अंत्यसंस्कार करण्यास गावगुंडांनी विरोध केल्याने मयताचे प्रेत थेट तहसील कार्यालय कर्जत येथे आणण्यात आले.
गावगुंड बबन किरदात, बाळू किरदात, संतोष किरदात यांचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कर्जत तालुक्यातील पदाधिकारी सोमनाथ भैलुमे, संजू शेलार, विकास समुद्र, पोपट शेटे, तुकाराम पवार, भाऊसाहेब जावळे, ललिता पवार, शितल पवार, चांगदेव आपा सरोदे, डीसेना पवार, रामचंद्र खंडागळे, संतोष चव्हाण, ऋषी गायकवाड, रंगीशा काळे आदींनी जोरदार निषेध नोंदवला.
आदिवासी समाजाला अंत्यसंस्कारा सारख्या मूलभूत हक्कासाठीही संघर्ष करावा लागत आहे, ही बाब अतिशय धक्कादायक असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.