प्रबुद्ध भारत वर्तमान आणि भविष्य समजावून सांगतो !
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक ते प्रबुद्ध भारत’ असा पत्रकारितेचा प्रवाह निर्माण केला. तो बाबासाहेबांनी चालवला. १९३० मध्ये बाबासाहेबांनी ‘जनता’ पाक्षिक सुरू केले. पुढे ४ फेब्रुवारी १९५६ रोजी ‘जनता’ पाक्षिकाचे रूपांतर “प्रबुद्ध भारत”मध्ये झालं. प्रबुद्ध भारत हे नाव घेतांना भारताचे संविधान लिहले जात होतं. भारताला ‘प्रबुद्ध’ करणे ही गरज होती म्हणून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ हे नाव ठेवले. या मागे लोकांना शहाणे करणे हा बाबासाहेबांचा उद्देश असल्याचे प्रबुद्ध भारतचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारतच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा देत म्हटले आहे.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी अनेक संकटांवर मात करून प्रबुद्ध भारत सुरू ठेवले. गेली अनेक वर्षे आम्ही ‘प्रबुद्ध भारत’ चालवतोय. यासाठी अनेक जण मदत करतात. वर्तमानपत्र हा चळवळीचा आरसा आहे. त्यामुळे हे वर्तमानपत्र चालविण्यासाठी सर्वांनी मदत करावी. मदत म्हणजे त्यांनी सभासद, वर्गणीदार व्हावे. ह्या दोन गोष्टी सर्वांनी केल्या, तर आंबेडकरी चळवळीचे वर्तमानपत्र चालू शकते. आज मोठ्या खेदाने म्हणावं लागतंय की, आंबेडकरी चळवळीतील माणूस हा इतिहासात जगतोय, तो वास्तवात जगत नाही. याचे सर्वात मोठे कारण की, वास्तव काय आहे? वर्तमान काय आहे? हे त्याला कोणी समजवून सांगत नाही असे त्यांनी नमूद केले.
‘प्रबुद्ध भारत’ आज वर्तमानस्थिती काय आहे? भविष्यकाळ काय आहे? हे समजावून सांगतो. म्हणून स्वतःला प्रबुद्ध करून घेण्यासाठी ‘प्रबुद्ध भारत’ वाचण्याचे, आपल्या समोरील आव्हाने समजून घेण्याचे आणि प्रबुद्ध भारतचे वर्गणीदार होण्याचे आवाहनही त्यांनी केले.