गडचिरोली: नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी भाषण केले. मात्र, या भाषणदरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न केल्याने या घटनेघे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या अवमानाचे प्रत्येक घटकातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत, गडचिरोलीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल करावा. तसेच महापुरुषांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत. गिरीश महाजन यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

यावेळी नाशिकमध्ये थेट मंत्र्यांच्या समोर निषेध व्यक्त करणाऱ्या रणरागिणी माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुक करून गडचिरोलीतील आंदोलकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे आणि ज्येष्ठ नेत्या वनिता बांबोळे यांनी केले. आंदोलनादरम्यान राज्य व केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, निरीक्षक जी. के. बारसिंगे, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बंसोड, प्रतिक डांगे, गुलाब मडावी, शहराध्यक्ष तुळशिराम हजारे, मनोहर कुळमेथे, युवा नेते सिद्धांत बांबोळे, साहिल बोदेले आणि सुखदेव वासनिक यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.






