महाराष्ट्राच्या सत्ताकारणात प्रचंड मोठी उलथापालथ होऊन एकनाथ शिंदे यांचे आणि भाजप युतीचे सरकार आले आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षा विरोधात बंड करून मविआचे सरकार पाडले ज्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले. शिवसेनेतील बहुतेक सर्वच प्रमुख नेते या बंडात सामील आहेत, सेनेच्या 55 पैकी 15 आमदाराच ठाकरेंसोबत उरल्यामुळे शिवसेनेच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
शिवसेनेत उफाळून आलेल्या या बंडाळी नंतरही शिवसेना पुन्हा उभी राहील आणि शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबतच राहतील असे प्रस्थापित पक्ष असलेल्या काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, पत्रकारांचे, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि आंबेडकरवादाचे पांघरूण घातलेल्या प्रस्थापितांच्या गुलामांचे मत आहे. ही सगळी मंडळी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुन्हा उभी राहिल असे ठणकावून समाज माध्यमांवर सांगत आहेत. पण शिवसेनेप्रति सहानुभूती दाखवणारी ही लोक अश्याच प्रकारची परिस्थिती जेंव्हा वंचित समाजातील पक्षांची होते तेंव्हा वंचितांच्या पक्षांची विशेषतः आंबेडकरी पक्षांची मोठ्या प्रमाणावर बदनामी करण्यात अग्रेसर असतात. सेने सारख्या धार्मिक राजकारण करणाऱ्या व सवर्ण नेतृत्व असलेल्या पक्षाला सहानुभूती आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या भारिप-बहुजन महासंघासारख्या पक्षांची बदनामी हा इथल्या प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांच्या गुलामांचा दुटप्पीपणा होय.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनि भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून १९९३ भीमराव केराम यांना आमदार निवडून आणलं होतं. मखराम पवार यांना १९९० मध्ये विधानसभेत आमदार केलं, १९९५ मध्ये विधानपरिषदेवर पाठवून मंत्रीपदी बसविल. त्यानंतर १९९९ साली दशरथ भांडे, रामदास बोडखे आणि वसंत सूर्यवंशी यांना विधानसभेला निवडून आणून आमदार केलं, भांडेंना मंत्री केलं. ही सर्व मंडळी सत्तेच्या आणि पैश्याच्या मोहापायी भारिप-बहुजन महासंघाशी बंडखोरी करून निघून गेली. जेंव्हा हि लोक बंडखोरी करत बाहेर निघाली त्या प्रत्येकवेळी ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले, भारिप-बहुजन महासंघाला आता काही भवितव्य नाही अश्या वल्गना करण्यात आल्या. एवढेच नाहीतर जेंव्हा जेंव्हा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंबेडकरी चळवळीने मतपेटीतून आपली ताकद दाखवली तेंव्हा तेंव्हा बाळासाहेबांना भाजपची बी टीम म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचे उदाहरण पाहायचे झाल्यास २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा (४० लाख) आणि विधानसभा (२५ लाख) निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने भरघोस मतदान केले होते, जनतेचे हे प्रचंड समर्थन तोडण्यासाठी ऍड. आंबेडकरांना आणि वंचितला भाजपची बी टीम म्हणण्यात आले. ऍड.आंबेडकरांची बदनामी करणारा हा प्रस्थापित, पत्रकार, पुरोगामी आणि त्यांचा गुलामांचा ‘कुटील आणि कपटी चमू’ आज सेनेत बंडखोरी झाल्यावर उद्धव ठाकरेंबद्दल सहानभूतीची लाट तयार करण्याचे प्रयत्न करतो आहे.
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदनामीचे हे सत्र न थांबता सुरु आहे. पण त्याने चळवळ थांबली नाही उलट जे सोडून गेलेत त्यांचेच हाल झालेले आपण पाहतो आहोत. भदे , सिरस्कार हे दोन माजी आमदार गेले, ते जिथे गेले तिथे आज त्यांना काहीच किंमत नाही. काही विधानपरिषदेच्या लोभापायी गेले आणि आज ते हास्यास पात्र ठरले आहेत. चळवळीत असलेल्या बहुतेक कार्यकर्त्यांना अश्या विखारी बदनामीमुळे काही फरक पडत नाही ते निरंतर संघटनेसोबत आहेत आणि संघटनेला मजबूत करत आहेत पण म्हणून आपण अफवांचे पीक उगवून वंचितांचे राजकारण संपवू पाहणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
इथल्या जातिव्यवस्थेने नेहमी वंचित आणि बहुजन संघटनांना आणि नेत्यांना संपविण्याचे प्रयत्न केले. कधी शत्रू बनून तर कधी मित्रत्वाचा मुखवटा चढवून बदनामीचे षडयंत्र रचण्यात आले. या व्यवस्थेत तळागळाशी असलेला जो वंचित समाज आहे त्याच्या वर येण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला येनकेन प्रकारे दडपण्यासाठी हा ‘कुटील आणि कपटी चमू’ सदैव कार्यरत असतो. पण त्याचवेळी सवर्ण पक्ष आणि त्यांचे नेते अडचणीत येऊ नयेत किंवा अडचणीत आल्यास ते त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास हीच मंडळी अग्रेसर असतात, शिवसेनेत नुकत्याच झालेल्या पक्षफुटीवेळी हे स्पष्टपणे दिसते आहे. वंचित आणि बहुजन जनतेला या ‘कुटील आणि कपटी चमूचा’ हा दुटप्पीपणा ओळखावा लागेल आणि आपले पक्ष, संघटना, नेते टिकवून ठेवावे लागतील तेंव्हाच सत्तेची दारे त्यांच्यासाठी उघडतील.