आंदोलकांवर जाळपोळ आणि खुनाच्या गुन्ह्याची नोंद ?
नागपूर : पोलिसांनी दिक्षाभूमी परिसर ताब्यात घेतला असून विशेष म्हणजे, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी मागविण्यात आली आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. कुणाला ही ओळखपत्राशिवाय दीक्षाभूमीकडे सोडण्यास मनाई करण्यात आलीय. सोबतच दीक्षाभूमीचे मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आले असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे यांनी सांगितले.
कोणालाही दीक्षाभूमीमध्ये प्रवेश देण्यास बंदी करण्यात आली आहे. दिक्षा भूमी वरील बेकायदा आणि अनावश्यक पार्किंग लॉट ही कमर्शियल कॉम्प्लेक्स उभी करण्यास अडथळा निर्माण होवू नये म्हणून सरकारने आता पोलिसांना पुढे केले आहे असे दिसते. असे त्यांनी म्हटले आहे.
राजेंद्र पातोडे म्हणाले की, एकीकडे सरकारने या कामावर स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे. तर दूसरी कडे झालेल्या आंदोलनासाठी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आंदोलकांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या अनुयायांचा समावेश होता. त्यांनीच आंदोलनस्थळी येऊन स्थानिकांच्या भावना भडकावल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे, असा दावा पोलीसांनी केला आहे. त्यामुळे आता या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
गंभीर गुन्ह्याची नोंद !
दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंग प्रकरणात बजाज नगर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले असून गैर कायद्याची मंडळी जमवून आंदोलन आणि जाळपोळ केल्याचा पहिला गुन्हा दाखल केला आहे. तर गैरकायद्याची मंडळी जमवून ठार मारण्याचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा आरोप अत्यंत गंभीर आणि आंदोलन करणारे आंबेडकरी अनुयायी ह्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव आहे. आंदोलक कुणाचा तरी खून करायला गेले होते हा आरोप लावला जाणे अत्यंत बालिशपणा वाटत असला तरी आंदोलकांना मोठया गुन्हात अडकवून ट्रस्ट आणि नागपुर सुधार प्रन्यास व सरकारला समाज कल्याणचा पैसा कमर्शियल कॉम्प्लेक्स वर खर्च करण्यासाठी भाजप नेते यांनी पुढाकार घेतला आहे असे दिसते. असे पातोडे यांनी नमूद केले आहे.
अर्थात पोलीस जाणीवपूर्वक नवी कथा सांगत आहेत करीत आहेत. आंदोलन उभे झाले ते स्थानिक पातळीवर, स्थानिक अनुयायी आणि संघटना ह्यांनी बेकायदा ट्रस्ट पदाधिकारी ह्यांचे सोबत बैठका घेऊन कमर्शिअल बिल्डिंग रद्द करण्याची मागणी केली होती. विशेषत: महिला अनुयायी आघाडीवर होत्या. असे असताना पोलीस मात्र नवा अँगल आणून नाहक वाद वाढवत आहेत. पोलीस गंभीर गुन्हे दाखल करीत असतील तर नागपुरातील आंबेडकरी वकील मंडळींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पातोडे यांनी केले आहे.
दाखल केलेला खुनाचा प्रयत्न ह्या एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करून आंदोलकांना कायदेशीर मदत करण्यास पुढाकार घ्यावा. दिक्षाभूमी पुनर्विकास योजना याला कुणीही विरोध केलेला नाही तर मूळ वाद आहे तो पार्किंग लॉट चे नावावर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करून त्यामुळे दिक्षाभूमी स्तूप आणि बोधीवृक्ष ह्यास निर्माण होणारा धोका. बोगस ट्रस्टी आणि भाजप जनप्रतिनिधी आणि रेशिमबाग मधील काहीचे साटेलोटे असल्याने तातडीने पोलिसाकरवी दिक्षा भूमी वर प्रवेश बंदी घातली गेली असल्याचेही पातोडे यांनी म्हटले.