देशाची विषमताधिष्टीत समाजरचना ही बरकाव्याने समजली गेली, तरच आम्हाला परिवर्तनाच्या बाजूने चिंतन करता येईल. या देशाला असलेल्या प्राचीन इतिहासात याचे मागोवे अनेक विचारवंतांनी घेतलेच आहे तसेच यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले आहे. भगवान बुद्धांनी वर्णव्यवस्थेला आक्रमकपणे क्षय दिला होता. समता प्रस्थापित करण्याचा त्यांचा सम्यक अट्टहास या सामाजिक बदलाला जबाबदार होता. बुद्धाच्या या क्रांतिकारक भूमिकांना लोकचळवळीचा आधार मिळाल्याने वर्णव्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी फार मोठी मदत झाली होती. हाच बुद्ध पुढे सर्व सामाजिक बदलांची प्रेरणा ठरलेला आहे.
संत चळवळीने पुढे जातीअंतासाठी बुद्धमार्गाने अनेक प्रयत्न केले. कदाचित यात कालसापेक्षता असेल परंतु अनेक प्रायोगिक भूमिका त्यांच्या चळवळीचे सकारात्मक बाजू राहिल्या आहे. अवहेलनेपासून हत्येपर्यंत हा सर्व संतचळवळीचा प्रवास राहिला आहे. परंतु संतांच्या वेदप्रामाण्यवादामुळे या चळवळीत ब्राम्हणी व्यवस्थेला शिरकाव अत्यंत सोपा झाला जो आजतागायत अजून ही शिल्लक आहे.
पुढे अनेक बृहरथाचा खून, पेशव्यांची सत्ता अशी कैक उदाहरण ही देशाचा सामाजिक स्तर ही कमकुवत करणारी ठरली. ब्राम्हणी षढयंत्र हे बाखुबी या कालखंडात प्रतिक्रांतीची बीजे रुजवत राहिले आहे. परंतु जर पूर्वग्रह बाजूला ठेवून इतिहासाचा अभ्यास केला, तर प्रत्येक काळात बहुजनांनी ब्राम्हणी व्यवस्थेला आव्हान बनून उभं राहण्याचे शौर्य दाखवलं आहे. ठोक परिवर्तन अनेक वेळा शक्य नसलं तरी अनेकांनी या परिवर्तनवादी चळवळीचे शिलेदार होण्याचे काम केले आहे.
बाबासाहेबांच्या मनुस्मृती दहना निमित्ताच्या भूमिकेचा मागोवा घेत असतांना आम्हाला या सर्व इतिहासातील तिक्ष्णता जाणवून घेणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांनी तिच्या विचारांचे सदैव दहन केल्याची भूमिका आम्हाला समजावी लागणार आहे. फुले दाम्पत्यांच्या क्रांतिकारक भूमिकेचा आशय घट्ट करावा लागणार आहे. या सर्व लढ्यांचे मर्म अखेरीस मनुस्मृती दहनाची रोखठोक कृती आहे.
‘यो लोभाद्धमों जात्या जीवेदुत्कृष्ट कर्मभि: ।
तं राजा निर्धनं कृत्वा क्षिप्रेमेव प्रवासयेत ।। (मनुस्मृती, १०,९६)
अधम जातींचा राजा जो कोणी उत्कर्षाच्या लोभाने वरिष्ठ जातीची वृत्ती चालविल त्याचे राजाने सर्वस्व हरण करून ताबडतोब त्याला देशोधडीला लावावे.
त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ या पुस्तकात मनुस्मृतीच्या नियमांबद्दल माहिती देतात. त्यानुसार-
२. २१३ पुरुषांना मोहित करणे हा स्त्रियांचा मूळ स्वभाव आहे आणि म्हणून बुद्धिमान माणसे स्त्रियांच्या सहवासात सुरक्षित राहू शकत नाही.
२. २१४ कारण या जगात स्त्रिया केवळ मूर्खांनाच वाईट मार्गाला लावत नाही, तर विद्वान माणसालाही वासनेचा आणि क्रोधाचा गुलाम बनवितात.
२.२१५ पुरुषाने आई, बहीण किंवा मुलगी यांच्याबरोबर एकांतात बसू नये. कारण इंद्रिये ही शक्तीमान असतात ती विद्वान माणसांनाही आपल्या प्रभुत्वाखाली आणतात.
९.१५ स्त्रिया पुरुषांच्या आसक्तीमुळे, त्यांच्या चंचल स्वभावामुळे आणि नैसर्गिक हृद्यशून्यतेमुळे त्यांचे कितीही काळजीपूर्वक संरक्षण केले, तरी त्या आपल्या पतीशी बेईमान होतात.
९.२ कुटुंबातील पुरुषांनी स्त्रियांना रात्रंदिवस आपल्या नजरेखाली ठेवावे. स्त्रिया ह्या विषयासक्त (चंचल) असल्याने त्यांना नियंत्रणात ठेवावे.
५.१४९ तिने स्वतःला पित्यापासून, पतीपासून आणि पुत्रपासून वेगळे ठेवू नये. जर ती तशी वेगळी राहिली, तर तिने स्वतःचे आणि तिच्या पतीचे कुटुंब तिरस्करणीय बनेल. स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार असू नये.
यांसारख्या अनेक बाबी बाबासाहेब सांगत मनुस्मृतीच्या विचारांची, त्या आधारित धर्म
शासनाची निंदा करतात. त्याचे दहन करतात.
ज्यावेळी एखाद्या कृतीतून बाबाबासाहेब या धर्माच्या अनिष्ट रूढीमध्ये हस्तक्षेप करतात. त्यावर भाष्य करतात, कृतीतून एखादे उत्तर देतात तेव्हा प्रज्ञासूर्याला विवेकी विचारांनी छेद देणे अशक्य असल्याने बुद्धीभेद हा प्रचार ब्राम्हणी षंढयंत्र वापरत असतो. बाबासाहेबांचे मंदिर प्रवेश, धर्मांतर यांसारख्या अनेक घटनांवर हा बुद्धीभेद करण्यात आला असतांना मनुस्मृती दहनाबाबत ही याच प्रकारे अनेकांनी नापसंतीचा सूर दर्शवला होता. पेणचा कुलाबा समाचार, धुळ्याचा प्रबोधनने, मुंबईच्या रणगर्जनेने, कोल्हापूरच्या हंटरने, पुण्याच्या भालासंग्रामने, बेळगावच्या परीक्षकाने यावेळी आपली नापसंती दर्शवली होती. बाबासाहेबांना ही आपल्या कृतीतील विवेकता टिकवून ठेवण्यासाठी टिकाकारांचा सपकपणा व खोटेपणा जगासमोर आणण्यासाठी प्रतिउत्तर देणे जबाबदारीचे काम होते. त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की, ‘आम्हाला कोणी वाईट म्हटले म्हणून आम्ही खरोखरच वाईट आहोत असे काही ठरत नाही’ तसेच बहिष्कृत भारतच्या ३ फेब्रुवारी १९२८ मध्ये युक्तिवाद करत असतांना युक्तिवादाते टीकाकारांना हे जारीणीची उपमा देत ‘पशुबरोबर आम्हाला पशु होण्याची इच्छा नाही’ याच रोखठोक बाबत उत्तर देतात.
वि. म. भुस्कुटे यांच्या ‘स्वराज्य’ या पत्रातून त्यांनी ही मनुस्मृती दहनाच्या बाबासाहेबांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. ‘मनुस्मृती ही जुन्या काळची जंत्री आहे. या जंत्रीतील नियम आज लागू होत नाही मग असे जुने बाड जाळण्यात काय अर्थ आहे? अस्पृश्य वर्गावर जो हजारों वर्षांचा अन्याय चालू आहे त्याला जबाबदार केवळ मनुस्मृती नाही. म्हणून हिंदु समाजात रूढ असलेल्या जातीविषयक व स्पृश्या अस्पृश्यविषयक कल्पना थोड्याच नष्ट होणार? अस्पृश्यांना जर आपले हक्क संरक्षित करून घ्यावयाचे असतील, तर आपली निरर्थक व मने प्रक्षुब्ध करणारी कृत्ये करण्यात काय बरे फायदे? ‘या त्यांच्या टीकेचा समाचार घेत असतांना बाबासाहेबांनी ही जंत्री नसून चालू वहिवाट असल्याचे दर्शवण्यासाठी मध्य हिंदुस्थानातील बळहायी या अस्पृश्य जातीने नवे सुधारणांचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्यावर निर्बंध लादले, तसेच कुलाबा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अस्पृश्यांची परिस्थिती ही त्यांनी उदाहरणादाखल मांडत आपला युक्तिवाद केला होता.
मनुस्मृती ही विषमताधारीत असल्याने आजदेखील या मनुस्मृतीचे दहन अनेक अब्राम्हणी, बहुजन चळवळी करत असतात. मागील साधारणतः तीन वर्षांपूर्वी दोन महिलांनी जयपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारातील मनु पुतळ्यावर काळ्या रंगाची शाई फवारली होती. त्यांच्या मतानुसार, बहुजन स्त्रियांच्या गुलामीला मनुस्मृती जबाबदार असतांना ही संविधानाला प्रमाण मानणाऱ्या न्यायालयाच्या आवारात मनुचा असलेला पुतळा हा निंदनिय होता. याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीमार्फत ही मनुस्मृती दहन दिवस हा ‘महिला मुक्ती दिवस’ या रुपात दरवर्षी साजरा करण्याची परंपरा आहे. आंबेडकरी आणि इतर बहुजन -पुरोगामी चळवळींनी ही मनुस्मृती दहनाची बाबासाहेबांची कृती गांभीर्याने लक्षात घेत आज ही त्याचे अनुकरण या दिवशी करण्याची प्रथा पाडली आहे.
आज देश ज्यावेळी पुन्हा प्रतिक्रांतीकडे आगेकूच करत आहे. देशात ५८ हजारांच्या आसपास अनुसूचित जातीचे सफाई कामकार आहे. महिलांच्या संरक्षणापासून त्यांच्या प्रतिनिधित्वापर्यंतचे प्रश्न समाजात पुन्हा डोके वर काढत आहे. केंद्रातील संघप्रणित भाजप सरकार आणि राज्यातील बहुजांच्या अत्याचारावर ब्र शब्द ही न काढणारे महाविकास आघाडी सरकार हे दोघे ही याच ब्राम्हणी – सामंती व्यवस्थेसाठी पूरक कृत्य करत आहेत. तर आंबेडकरी चळवळीवर फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे, हे समजत पुन्हा संविधानाच्या आधाराने हा क्रांतीस्तंभ सज्ज करायला हवा !
- संविधान गांगुर्डे