वंचित बहुजन आघाडीच्या एक्स हॅंडलवर पोस्ट
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये लफडा आहे, हे खरे नाही का? लफडा असूनही, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीविषयी सकारात्मक असल्याचे वंचित बहुजन आघाडीने एक्स हॅंडलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यात महाविकास आघाडीला खडे बोल सुनावण्यात आले आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक पक्ष ज्या पद्धतीने आपापले उमेदवार जाहीर करत आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? काल सुप्रिया सुळे यांना बारामतीतून आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) उत्तर-पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले. अशा पद्धतीने आघाड्या चालतात का? मविआतील पक्ष आघाडी म्हणून नाही तर एकटेच निर्णय का घेत आहेत? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
तसेच, तुम्ही आम्हाला सर्व अंतर्गत चर्चा आणि बैठकांपासून दूर ठेवत आहात. पण, निदान चर्चा करून आणि आघाडी म्हणून उमेदवार जाहीर करा. आम्हाला आशा आहे की, या मुद्द्यांवर सर्वजण एकत्र बसून समाधान निघेल. तसेच, आम्ही पुन्हा अधोरेखित करत आहोत की, आम्ही महाविकास आघाडीबद्दल सकारात्मक आहोत, याचा पुनरुच्चार देखील यात करण्यात आला आहे.