पिंपरी चिंचवड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेचे लोकशाहीरकरण केले. मराठी पत्रकारिता एका जातीत, साच्यात बंदिस्त होती. त्याचे रूप बाबासाहेबांनी पालटले आणि पत्रकारितेचा प्रवाह प्रशस्त केला. पत्रकारितेला आयाम देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. एक पत्रकार म्हणून बाबासाहेबांचे महत्व इतिहासाने डाववले अशी खंत प्रबु्ध्द भारताच्या कार्यकारी संपादिका प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवडमधील चिखली गावात प्रबुद्ध भारताच्या वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. प्रा. अंजलीताई म्हणाल्या, बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्याच्या संघर्षातील टप्प्यावर वेगवेगळी वर्तमानपत्रे सुरू केली. कुठल्याही देशामध्ये सक्षम लोकशाहीसाठी स्वतंत्र माध्यमं हा महत्वाचा मानला जातो. त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जात. पण, आज आपल्या देशात हा चौथा स्तंभ सरकारच्या पूर्ण आहारी गेलेला आहे असा दिसतोय. मराठी पत्रकारिता गोखले, टिळक, आगरकर, परांजपे यांच्यापर्यंत सिमीत होती. बाबासाहेबांनी पत्रकारितेचे लोकशाहीकरण केले.
1956 मध्ये प्रबुद्ध भारत सुरू झाले. बाबासाहेबांच्यानंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांनी परकीय आणि स्वकीयांशी लढून प्रबुद्ध भारत सुरू ठेवला. तीच जिद्द घेऊन आज प्रबुद्ध भारत सुरू आहे. सर्वजीत बनसोडे म्हणाले, भारतातील प्रस्थपित मीडिया हा इथल्या लोकांसाठी नसून भाजप – काँग्रेसच्या हातातली कठपुतली बनलेला आहे. म्हणून इथल्या माध्यमांकडून सामान्य माणसाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. आगामी काळात जर वंचित, दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल, तर प्रबुद्ध भारत शिवाय पर्याय नाही. कारण, प्रबुद्ध भारतामध्ये विद्वत पुराव्याशिवाय काहीही प्रकाशित करण्यात येत नाही.
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, प्रबुद्ध भारताचे उपसंपादक जितरत्न पटाईत, वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्ष लताताई रोकडे, मा. नगरसेवक कार्याध्यक्ष अंकुश कानडी, महासचिव राजन नायर, राजेश बारसागडे, सुनील गायकवाड, भारतकुमार कुंभारे, दशरथ शिंदे, धनंजय कांबळे, संजय ठोंबे,शशिकुमार टोपे, प्रवीण हेलवे, शिवाजी खडसे, चंद्रकांत गायकवाड, विशाल धुळधुळे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भोसरी विधानसभेचे अध्यक्ष अनिल भारती, अनुसयाताई भारती यांनी केले, सूत्रसंचालन संतोष जोगदंड यांनी केले. तर आभार अनुसयाताई भारती यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवनी कांबळे यांनी केले.