ख्रिस्ती समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये 13 जानेवारी 2023 रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया वरती ख्रिश्चन बांधवांनी काढलेल्या निषेध मूक महामोर्चाला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित राहून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना आदरणीय अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. स्वतःला हव्या असलेल्या चालीरीती पाळण्याचे, आपल्याला हवी असलेली धार्मिक उपासना करण्याचे, धार्मिक शिक्षण देण्याचे आणि स्वतःचे विचार मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचे आहे. सरकारने धर्मांतर विरोधी केलेला कायदा हा संविधान विरोधी आहे असे आम्ही मानतो. या कायद्याच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई अथवा आंदोलनात्मक लढाई यासाठी वंचित बहुजन आघाडी अग्रस्थानी असेल असे अंजलीताई म्हणाल्या. ख्रिश्चन समाजाच्या या आंदोलनाबरोबर वंचित बहुजन आघाडी तसेच फुले-शाहू-आंबेडकरवादी सर्व आपल्या समवेत असतील असेही म्हणाल्या. कोणताही धर्म मानवतेची शिकवण देतो. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवत नाही. कोणताही धर्म हा रंजल्या गांजल्यांना जवळ करतो, त्यांना सन्मानाचे जीवन देतो. भारतातील शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक शिक्षण संस्था या ख्रिश्चन समाजाने चालवलेल्या असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. भारताच्या अतिशय दुर्गम भागामध्ये शिक्षण पोहोचवण्याच्या, तसेच भारताच्या जडणघडणीमध्ये या समाजाचे खूप मोठे योगदान आहे. अंजलीताईंनी स्वतः स्त्रीमुक्ती चळवळीतील असल्यामुळे पंडिता रमाबाई यांना आदर्श मानत असल्याचे सांगितले. तसेच भारतीय संविधान वाचवण्यासाठी जे काही आंदोलने होतील त्या सर्व आंदोलनामध्ये आपण ख्रिश्चन बांधवांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे देखील त्यांनी या वेळेला सांगितले.