ॲड. प्रकाश आंबेडकर : आजच्या काळात मतदान हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे
बुलढाणा : बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य धम्म मेळावा पार पडला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा जयघोष आणि बुद्ध वंदनेने परिसर दुमदुमून गेला होता. या धम्म मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी संबोधित केले.

ॲड. आंबेडकर भाजप सरकारवर हल्लाबोल करत म्हणाले की, आणखी 5 वर्ष हे सरकार चाललं, तर महाराष्ट्रातल्या सव्वा दोन कोटी मतदारांचा बळी घेतला जाईल, हे SIR सुरू होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले होते. SIR सुरू झाल्यावर तसेच झाले. आजच्या काळात मतदान हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, ते आपण जपलं पाहिजे. प्रत्येक युगामध्ये गुलामीची व्याख्या बदलते आणि चिन्हेही बदलतात. ते ओळखणं आणि जपणे हे आपले काम आहे.
राज्यात पडलेल्या दुष्काळावर ॲड. आंबेडकरांनी लक्ष वेधले. दिवाळीनंतर गावागावात पाण्यावरून भांडणे होतील. देवा, धर्माच्या नावावर ज्याला तुम्ही सत्तेत बसवले आहे, त्याच्या घरासमोर जाऊन आम्हाला जेवण घाल आणि पाणी दे अशी मागणी करा. सरकारकडे रेशनमध्ये द्यायला सुद्धा धान्य नाहीये. आधीचे सरकार तीन वर्षे पुरेल एवढा अन्न-धान्यांचा साठा ठेवायचे. जेणेकरून लोकं उपाशी राहणार नाहीत. आताच्या सरकारने साठा करणे बंद केला आणि खाजगी व्यापाऱ्याला साठा करायला सांगितले. पुढील पावसाळ्या पर्यंत लोकांना पिण्यासाठी पाणी किती मिळेल? शेतीसाठी किती मिळेल? उद्योगासाठी किती पाणी मिळेल? याचा आराखडा सरकारकडे नसल्याचे त्यांनी सांगितले.
सगळं काही आलबेल आहे असं भासवले जातंय. लोकांचे दुष्काळाकडे लक्ष जाऊ नये, म्हणून 500 कोटींची क्लिप बाहेर काढली गेली. जेणेकरून लोकं त्यात गुंततील. दुष्काळी परिस्थितीत लोकांनी आरएसएसचे लोकं, भाजपचे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांना पाणी, अन्न-धान्य मागावे. कारण, ते सत्तेत आहेत, त्यांची ही जबाबदारी आहे. यात लाज वाटण्यासारखे काही नाही. आत्महत्या करण्याची मानसिकता सोडा आणि ठोकायची मानसिकता बनवा. दुष्काळ फक्त ह्याच वर्षी नाही तर पुढील वर्षी देखील पाऊस कमी होईल, अशी चर्चा आहे. दुष्काळाला दोन वर्षे तोंड द्यावे लागेल की काय? अशी परिस्थिती आहे. शासनाची भूमिका यावर स्पष्ट नाहीये. असे ॲड. आंबेडकरांनी म्हटले.
काँग्रेसच्या ढोंगीपणावर बोलताना त्यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशात मार्च – एप्रिल मध्ये निवडणुकांचे बिगुल वाजेल. तिथे काँग्रेसची ताकद नसताना आम्हाला २०० सीट द्या, असे पोस्टर्स काँग्रेसने लावल्याचे सोशल मीडियावर दिसले. जिथे 10 जागा जिंकून आणण्याची ताकद काँग्रेसची नाही, तिथे 200 जागा मागितल्या जाताय. 2019ला उत्तर प्रदेशात भाजपविरोधात आघाडी उभी राहिली असती तर भाजप सत्तेत नसती. पण, विरोधकांच्या काही चुकांमुळे ती आघाडी गेली. उत्तर प्रदेशात एकत्र येऊन लढण्याची वेळ असताना, या ठिकाणी आम्ही वेगळं लढणार असे काँग्रेसवाले सांगायला लागलेत. काँग्रेसवाल्यांना एवढंच सांगू इच्छितो, तुमचे हे खेळ आमच्या लक्षात आलेले आहेत. इथले आरएसएस-भाजप सरकार टिकावे म्हणून तुमची ही पावलं आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा या मेळाव्यातून निशाणा साधला. याबाबत ॲड. आंबेडकर म्हणाले की,आपण रशियाकडून कच्चे तेल विकत घेतो म्हणून अमेरिकेने आपल्यावर 100 टक्के टेरिफ लावला. मात्र, त्याच अमेरिकेने गेल्या आठवड्यात रशियाकडून पेट्रोल खरेदी केली पण, पंतप्रधान मोदी, आरएसएसचा आवाज त्याविरोधात निघाला नाही.कारण, हे सर्व डोनाल्ड ट्रम्पचे गुलाम आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना सांगतोय की, तुम्ही नाचलेले फोटो आम्ही सार्वजनिक करू. त्यामुळे आम्ही जे सांगतोय ते करा.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आधी म्हणत होता की, माझी एपस्टिन सोबत कधी भेटच झाली नाही, असं म्हणत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी एपस्टिन आणि हरदीप पुरीचे फोटो अमेरिकेने सार्वजनिक केले आहेत. ही सगळ्यात मोठी बातमी व्हायला पाहिजे होती मात्र, तसे झाले नसल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले.
#PrabuddhBharat






