पुणे : १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा-कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने यंदा विशेष तयारी करण्यात आली आहे. ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयस्तंभ परिसराचे सौंदर्यीकरण आणि अनुयायांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
नैसर्गिक आणि कृत्रिम फुलांची आकर्षक सजावट
यावर्षीचे खास आकर्षण म्हणजे विजयस्तंभावर केली जाणारी फुलांची सजावट. बार्टीचे निबंधक विशाल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ‘संविधान अमृत महोत्सवी वर्ष’ असल्याने सजावटीमध्ये राष्ट्रीय चिन्हांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असेल:
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये विजयस्तंभाला दिलेल्या भेटीचा ऐतिहासिक फोटो
२) राष्ट्रध्वज तिरंगा, अशोक स्तंभ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा
३) महार रेजिमेंटचा लोगो, यश सिद्धी आणि ‘स्वातंत्र्य, समता, न्याय’ ही संवैधानिक मूल्ये
४) निळा, भगवा, पिवळा, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या नैसर्गिक व कृत्रिम फुलांचा वापर करून स्तंभ सुशोभित केला जाईल.
सेल्फी पॉईंट्स आणि सोयीसुविधाशौर्य दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या लाखो भीम अनुयायांची गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.
विजयस्तंभासोबत फोटो काढण्यासाठी अनुयायांची होणारी ओढाताण टाळण्यासाठी तीन विशेष सेल्फी पॉईंट्सची निर्मिती करण्यात आली आहे.
भीमा नदीवरील नगर रोड पुलावरील चार विजयस्तंभ प्रतिकृती आणि संपूर्ण पुलावर फुलांची सजावट केली जाणार आहे. तसेच भीम अनुयायांना पाणी, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी बार्टीने सर्व सरकारी विभागांशी समन्वय साधला आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी दिली.
ऐतिहासिक वारसा जपणारा सोहळा
२०८ व्या शौर्य दिनानिमित्त होणारा हा सोहळा शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात पार पडावा, यासाठी ‘बार्टी’ने विशेष पुढाकार घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयस्तंभाचा परिसर फुलांच्या सुगंधाने आणि रोषणाईने उजळून निघणार आहे.






