पुणे : १ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दाखल झाले होते. मात्र, प्रशासनाने केलेल्या तयारीचे दावे फोल ठरले असून, सोयी-सुविधांच्या अभावामुळे अनुयायांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. स्थानिक प्रशासनाकडून मूलभूत सुविधाच मिळाल्या नाहीत.

महामानवांचे फोटो जमिनीवर
प्रशासनाकडून विक्रेत्यांसाठी स्टॉल उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक स्टॉलवर ना टेबल होते ना खुर्च्या. यामुळे नाईलाजास्तव विक्रेत्यांना जमिनीवर बसून वस्तू विकाव्या लागल्या.
दुर्दैवी बाब म्हणजे, ज्या महामानवांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी नागरिक जमले होते, त्या महापुरुषांचे फोटो आणि प्रतिमा ठेवण्यासाठी टेबल नसल्याने त्या जमिनीवर ठेवून विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली. या प्रकारामुळे अनुयायांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

प्रशासनाने शौचालय, पाणी आणि निवारा शेडचे आश्वासन दिले होते, मात्र जमिनीवरची परिस्थिती वेगळीच होती.

पिण्याचे पाणी : ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तिथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. चिखल आणि साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांना पाणी पिणेही कठीण झाले होते.

हिरकणी कक्ष : महिला आणि लहान मुलांसाठी उभारलेल्या ‘हिरकणी कक्षात’ अधिकारी स्वतः आरामात बसलेले दिसले, तर अनुयायांसाठी साधी सतरंजी किंवा बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. परिणामी, माता-भगिनींना जमिनीवर बसावे लागले.

कचरा व्यवस्थापन : मैदानावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. मोठ्या प्रमाणावर जाहिरात करूनही स्वच्छतेबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले.

सरकारी अनास्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हवेली यांच्यामार्फत आरोग्य सुविधा, निवारा शेड आणि इतर सुविधा पुरवण्याचे कागदोपत्री नियोजन होते. मात्र, प्रत्यक्षात अनुयायांना हक्काच्या सुविधांसाठी संघर्ष करावा लागला. “प्रशासनाने केवळ जाहिरातबाजी केली, पण प्रत्यक्ष कामात मात्र ढिसाळपणा दाखवला,” अशी भावना भीम अनुयायांनी व्यक्त केली.





