बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत बारामती नगरपरिषद क्षेत्रात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगलदास निकाळजे यांच्या प्रचार रिक्षेची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच तोडफोडीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंची विटंबना करण्यात आले.
प्रस्थापितांकडून रडीचा डाव :
बारामती नगरपरिषदेसाठी अवघ्या दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर लावला असताना, बारामती एसटी स्टँड परिसरात वंचित बहुजन आघाडीची प्रचार रिक्षा फिरत असताना हा हल्ला झाला. पराभवाच्या भीतीने धास्तावलेल्या प्रस्थापितांनीच हा भ्याड हल्ला घडवून आणल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
रिक्षेची तोडफोड करत असताना महामानवांच्या फोटोंचे नुकसान करण्यात आले. या कृत्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त केले जात आहे. आचारसंहिता लागू असताना भररस्त्यात असा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
‘साम, दाम, दंड, भेद’ वापरला तरी हार मानणार नाही :
या घटनेनंतर उमेदवार मंगलदास निकाळजे आणि त्यांच्या समर्थकांनी अत्यंत आक्रमक जिद्दीची भूमिका घेतली आहे सांगितले की,”आमच्या वाढत्या प्रभावाला घाबरून विरोधकांनी हे कृत्य केले आहे. साम, दाम, दंड, भेद यांसारख्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मागे हटणार नाही. या छळाला आम्ही मतदानाच्या माध्यमातून उत्तर देऊ आणि बारामती नगरपालिकेवर वंचितचा झेंडा फडकवून दाखवू.”





