Baramati Election 2026 : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक अनेक वर्षानंतर काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतला असून, हा त्यांचा संविधानिक अधिकार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून, या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीने स्वतःचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता तथा राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, काँग्रेस बारामतीत पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे आणि ही आनंदाची बाब आहे. (Baramati Bypoll 2026)
दरम्यान, काँग्रेसकडून या निवडणुकीत राहुल गांधी यांना प्रचारासाठी मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याचेही समजते. यावर प्रतिक्रिया देताना मोकळे म्हणाले की, जर काँग्रेसने राहुल गांधींना बारामतीत प्रचारासाठी बोलावले, तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील प्रचारात उतरतील. (Baramati Bypoll 2026)
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीतील निवडणूक वातावरण अधिकच रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.





