रिपब्लिकन ऐक्याची घोषणा होताच बहुजन महासंघाने आपली भूमिका जाहिर केली होती. फुले-शाहू-आंबेडकरी तत्वज्ञानावर श्रध्दा आणी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे उद्दीष्ट असल्याने याच तत्वज्ञानावर व बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पक्ष उभा करण्याचा संकल्प केल्यामुळे “रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया हा आपला नैसर्गिक मित्र” असल्याचेमहासंघाने जाहीर केले होते. त्याला अनुसरून रिपाईच्या अध्यक्षीय मंडळाने ९ जानेवारी ९६ रोजी नागपूर येथे बहुजन महासंघाला आमंत्रित केले होते. या बैठकीत रिपाईसुध्द बहुजन महासंघाला आपला नैसर्गिक मित्र मानते. ही भूमिका अध्यक्षीय मंडळाने सांगितली. या सभेत त्याची घोषणाही झाली. महासंघाचे अध्यक्ष आयु. मखराम पवार यांना या सभेचे विशेष आमंत्रण देण्यात आले. याच भुमीकेतून मखरामजी व्यासपिठावर गेले.
सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अध्यक्षीय मंडळाचे प्रवक्ते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी पक्षाच्यावतिने संअत झालेले सात ठराव वाचून दाखविले आणि मान्यता घेतली.
इतर समूहांचे नेतृत्व स्विकारण्याची मानसिकता जोपासावी
अॅड. खासदार बाळासाहेब आंबेडकर
रिपाईंचे प्रवक्ते खा. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात रिपांईवरील अनेक आरोपांबाबत भूमिका मांडली. त्याचबरोबर राजकारणातील ढासळणारी नैतिकता, धर्म आणि राजकारण, राजकारणातील गुन्हेगारी-भ्रष्टाचार, बाळ ठाकरेंचे बेताल वर्तन, हवाला प्रकरण, श्रिकृष्ण आयोग, काश्मिरबाबतची भाजप-सेनेची भूमिका, एनरॉन प्रकल्प व कोकणचे पर्यावरण, खुली अर्थ व्यवस्था-खाजगीकरण-जागतिकीकरण आणि विदेशी तंत्रज्ञान आणि ख्रिश्चनांच्या सवलती, अल्पसंख्यांक आयोग रद्द करणे, आदी अनेक प्रश्नांवर परखड भूमिका मांडली.
रिपाईच्या विराट सभेसमोर भाषण करताना खासदार बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, “रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलले आहे. त्यामुळे राजकारणाची दिशाही बदलत आहे. आज उभी राहिलेली ही शक्ती अशीच राहिली व इतर समूहांचे नेतृत्व स्विकारण्याची तयारी केली तर महाराष्ट्राची सत्ता हाती आल्यशिवाय रहाणार नाही.” असेही एड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षावर एक जातीय असल्याचा आरोप करणा-यांचा समाचार घेताना एड. आंबेडकर म्हणाले, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही फक्त एका समाजाची संघटना आहे अशा रितीचा प्रचार करण्यात येत आहे. हा प्रचार खोडसाळ आहे. कारण की, आजपर्यंत रिपब्लीकन पक्षाने समूहांचे प्रश्नांवरच लढा उभा केला आहे. तेव्हा पक्षाला एका समाजापुरता मर्यादीत आहे असे म्हणता येणार नाही. ज्यांनी हे आरोप केले ते किती खालच्या पातळीवरुन विचार करीत आहेत हे स्पष्ट होते. देशातील नैतिकताच ढासळली असतांना राजकारणाला धर्माचे अधिष्ठान देणा-यांना आम्ही एकत्र येण्याची भिती वाटणारच! ज्यांनी आमच्यावर टिका केली आहे; त्यांना याची जाणीव आहे. देशांतर्गत जे धर्मविरहीत राजकारण करीत आहेत; त्याचे आम्ही केंद्रबिंदू होवू शकतो. म्हणून आमच्यावर अशा त-हेचे आरोप केले जात आहेत.
राजकारणात भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांच्याबद्दल ओरड केली जाते. ही गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार का घुसला याचे कारण असे की, देशपातळीवर जी नेतृत्वाची संकल्पना आहे; त्याप्रमाणे काहीच समाजाचे नेते हे राष्ट्रीय नेते किंवा सर्वांचे नेते होऊ शकतात. इतर समजांना जाणीवपुर्वक बाहेर ठेवले जाते. गेल्या ४०-४५ वर्षांच्या राजकारणात नेतृत्व काहीच समाजातच मर्यादीत झाल्यामुळे त्यांची आपसात भांडणे सुरु झाली आणि त्यांनी अगोदर राजकारणात भ्रष्टाचाराला वाव दिला. जैन हवाला प्रकरणातून देशावर माफियांचे राज्य आहे हे स्पष्ट होते. यातून बाहेर पडावयाचे असेल तर इतर समूहांचे देखील नेतृत्व स्विकारण्याची मानसिकता समाजाने जोपासली पाहिजे.
बाळ ठाकरे तुमची भाजपशी सोयरिक कशी?
बाळ ठाकरे यांनी बाबासाहेबांनी निझामाकडून जमीन घेवून औरंगाबादचे कॉलेज बांधले. त्यामुळे बाबासाहेब हे निझामाचे हस्तक आहेत असे म्हटले आहे.
बाळ ठाकरे यांना आमचा सवाल आहे की, लालकृष्ण ललवाणी यांचे देखील नावही जैन हवाला प्रकरणात आहे. जैन हवाला प्रकरण म्हणजे काश्मिरी अतिरेक्यांकडून आलेला पैसा. देशभक्तीचा कित्ता गिरविणारे बाळ ठाकरे यांना विचारतो की, आता तुमची बोलती बंद का झाली? काश्मिर हा भारतापासून अलग होणार नाही; अशा आपण घोषणा दिल्या. आता तुमची भाजपशी सोयरिक कशी जमते याचा खुलासा करावा?
एनरॉनमुळे कोकणचे पर्यावरण धोक्यात
एनरॉनप्रकरण नव्या सरकारने पुन्हा स्विकारले आहे. एम.एस.ई.बी. एनरॉनला देण्यासाठी विदेशी मुद्रा कोठून आणणार याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलेला नाही. महाराष्ट्र शासनाकडे देखील विदेशी मुद्रा कोठून येणार? एनरॉन प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यासाठी नॅफ्ताचा वापर करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. नॅफ्ताचा वापर केल्याने पर्यावरणाचा नाश होणार आहे. आणि पुन्हा कोकणाचे पर्यावरण नष्ट होणार आहे.
खुली अर्थव्यवस्था: सामाजिक-अर्थ व्यवस्थेचा खेळखंडोबा
खुली अर्थ व्यवस्था सरकारने स्विकारून पुन्हा एकदा सामाजिक-आर्थिक विषमता वाढविण्याचा खेळखंडोबा सुरू केला आहे. राखीव जागांचा प्रश्न तर शिल्लक रहातोच. परंतू खाजगीकरणाच्या नावाने देश विकायला काढलेला आहे. खाजगीकरणातून जागतिकीकरण आणि त्या मार्गाने बॅलन्स ऑफ पेमेंटचा प्रश्न निर्माण होतो. जागतिकीकरणातून विदेशी टेक्नॉलॉजी जसीच्या तशी आयात केल्यामुळे कामगार बेरोजगार होत आहे. त्यामुळे तरुण पिढीला कामाची संधी मिळत नाही.
दलीत-ख्रिश्चनांना सवलती-आमचा पाठिंबा
दलीत-ख्रिश्चनांना सवलती मिळाव्यात यासाठी पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटबाहेर लढत राहिलो. आजही मागणी करीत आहोत की, दलीत ख्रिश्चनांच्या सवलती मिळाल्याच पाहिजेत. एक विशेष बदल झालेला आहे की, जे दलीत-ख्रिश्चन नाहीत त्यांनी एक दिवस शाळा आणि कॉलेजेस बंद करून आमचाही दलीत-ख्रिश्चनांना सवलती मिळाव्यात यासाठी पाठिंबा आहे. हा बदल झालेला दृष्टिकोण आहे. या बदलाचे मी स्वागत करतो. असाच दृष्टिकोण इतरांनीही बदलावा असे मी आवाहन करतो. अल्पसंख्यांक आयोग हा फक्त मुस्लिमांसाठी आहे असा जो प्रचार केला जातो तो धादांत खोटा आहे. अल्पसंख्यांक आयोग हा मुस्लिम, बौध्द, शिख या सर्वांसाठी आहे. सेना बी.जे.पी. सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम हा आयोग बरखास्त केला आणि त्यानंतर मुंबईतील धार्मिक दंगलींची चौकशी करणारा चौकशी करणारा श्रिकृष्ण आयोग हा ही रद्द केला. त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या विश्वासाला तडा गेला आहे. आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करीत आहोत की, त्यांनी त्वरीत राज्य सरकार बरखास्त करावे.
आयु. राजा ढाले
पक्ष प्रवक्ते खा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रास्ताविक व मुख्य ठराव वाचनानंतर पहिले भाषण अध्यक्षीय मंडळाचे सदस्य व साहित्यीक-विचारवंत आयु. राजा ढाले यांचे झाले. त्यांनी आपल्ल्या भाषणात अध्यक्षीय मंडळाची भूमिका विशद केली.
धर्मांद-जातीयवादी शक्तींना गाडण्यासाठी आणि भ्रष्ट कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संघटीत झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया उभी करायची आहे असे सांगून त्यांनी तमाम शोषीतांची, उपेक्षितांची ही चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी रिपाइं स्विकारीत असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर बहुजन महासंघ हा आमचा नैसर्गिक मित्र असल्याचेही आयु. ढाले यांनी जाहीर केले.
आयु. मखराम पवार
बहुजन महासंघाचे अध्यक्ष आयु. मखरामजी पवार यांचे महासंघाची भूमिका सांगणारे भाषण झाले. आयु. मखरामजींनी डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नातील सामाजिक ऐक्याचा उल्लेख केला आणि महाराष्ट्रात नवा राजकीय इतिहास लिहीण्यासाठी आपण जमलो असल्याचे सांगितले. बहुजन महासंघ उभा करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना मखरामजींनी ओबिसी व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांची मांडणी केली. समोरच्या सभेला उद्देशून ते म्हणाले की, हा केवळ मेळावा नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावलेला आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा सांगणा-या बहुजन व धार्मिक अल्पसंख्यांकांच्या ऐक्याचीच ही मुहूर्तमेढ आहे. हे ऐक्य केवळ लोकसभा निवडणूकीचा मुहूर्त साधून घडविले गेलेले संधिसाधू ऐक्य नाही. तर गेली तीन वर्षे आम्ही ते घडविण्यासाठी अथक प्रयत्न करीत होतो.
युती सरकारवर घणाघाती टिका करून आयु. मखरामजी पुढे म्हणाले की, शिवशाहीच्या नांवे महाराष्ट्रात पेशवाई सुरू झाली असून जातीवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. इतर राजकीय पक्षातील बहुजनांना त्यांनी या विराट शक्तीत सामिल होण्याचे आवाहन केले. सेनाप्रमुख बाळासाएब ठाकरे हे मंडल आयोगाच्या विरोधी असल्याचे सांगून सेना-भाजपमधील ओबिसंना ठाकरेंची साथ सोडण्याचे आवाहन केले. गेल्या विधानसभा निवडणूकीचे विश्लेषण करून मखरामजींनी आरोप केला कि, सेना-भाजप युतीचे किमान ८० आमदार कॉंग्रेसनेच निवडून आणले आहेत. याचाच अर्थ जात्यंत-धर्मांध युतीचे हे सरकार कॉंग्रेसच्या हरामखोरीचे-बेईमानीचे फळ आहे. म्हणून या दोन्ही शक्तींचे पानीपत येत्या निवडणूकीत केले पाहिजे.
शांताराम पंदेरे