औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘बहुजनांचा जाहीरनामा’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात शहराच्या सर्वांगीण विकासाचा शब्द देण्यात आला असून, सत्ता आल्यास शहराला २४ तास पाणी पुरवठा आणि महापालिका शाळांमध्ये ‘केजी टू पीजी’ (KG to PG) मोफत शिक्षण देण्याचे महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले आहे.
भीमनगर भावसिंगपुरा येथील जाहीर सभेत पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात जनतेच्या मूलभूत प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले आहे:
१) नवीन पाणी पुरवठा योजना तात्काळ मार्गी लावून शहराला २४ तास पाणी देणार
२) महापालिकेच्या शाळांतून पदव्युत्तर स्तरापर्यंत (KG to PG) मोफत शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा
३) अतिक्रमणात पाडण्यात आलेल्या घरांच्या बदल्यात नवीन घरे बांधून देणार. झोपडपट्टी निर्मूलन करून रहिवाशांना जमिनीचे मालकी हक्क (पट्टे) देणार
४) महिला सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ व सुलभ कर्ज उपलब्ध करून देणार.
५) शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी संवर्धनाचे काम हाती घेऊन पर्यटनाला चालना देणार.
इतर सुविधा: कर रचनेत सुधारणा, ई-गव्हर्नन्सवर भर, सार्वजनिक वाहतूक आणि स्वच्छता या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करणार.

६२ उमेदवारांना संधी; सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व
पक्षाच्या निरीक्षक अरुंधती शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, वंचित बहुजन आघाडीने यावेळी ६२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न तिकिट वाटपात करण्यात आला असून, यामुळे जनतेतून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तिकीट वाटपात भाजपने मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाइं) डावलल्यामुळे आंबेडकरी जनतेत संताप आहे. भाजपला धडा शिकवण्यासाठी रिपाइंचे काही पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत. “रिपाइंने जाहीर पाठिंबा दिल्यास आम्ही त्याचे स्वागत करू,” असे मत जिल्हाध्यक्ष ॲड. रामेश्वर तायडे यांनी व्यक्त केले.

शहरात सध्या वंचितच्या वतीने पदयात्रा, कॉर्नर मीटिंग आणि सभांचे सत्र सुरू आहे. अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची आमखास मैदानावर भव्य सभा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर राहुल मुगदल, सांडू श्रीखंडे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.






