वाशिम : बाबासाहेबांनी आपल्याला 1927 साली पाण्यासाठी लढायला शिकवले. पाण्यासाठी संघर्ष करायला शिकवले. 2027 मध्ये आपण प्रवेश करताना महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षात असताना आपल्याला पुन्हा एकदा पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या, अंजलीताई आंबेडकर यांनी वाशिम येथील धम्म मेळाव्यात व्यक्त केले.
त्यांनी म्हटले की, आपल्या हक्काचे पाणी आपल्याला पिण्यासाठी, आपली गुरे जगवण्यासाठी आणि आपल्या शेतीसाठी वापरायला मिळाले पाहिजे. हा अधिकार आपण पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. राज्यात एवढा मोठा दुष्काळ असतांना अत्यंत खडसावून सांगण्याची वेळ आलीय की, या देशातील जमिनीवरचे साठवलेले पाणी असो वा भूगर्भातील पाणी असो त्यावर आमचा हक्क आहे. पहिला हक्क हा माणसांचा पाणी पिण्याचा आहे. गुरांचा हक्क आहे. शेतीसाठी पाण्यांचा आहे. हे भागले, तरच डेटा सेंटरसाठी पाणी द्या.

जोतिबा फुले, सावित्रीमाई आणि बाबासाहेबांनी आपल्याला डोळे उघडण्याची संधी शिक्षणाद्वारे दिली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, त्यांनी असे म्हटले. केवळ पदवी मिळवून नोकरीला लागणे आणि स्वतःचे पोट भरणे एवढ्यापुरते त्यांनी शिक्षणाकडे पाहिले नाही, तर शिक्षणामुळे आपल्या देशात चाललंय काय? सरकार काय धोरणे आखत आहेत? आपल्या हक्कांवर काय गदा येतेय ? त्यासाठी कसे भांडायचे आहे ? हे त्यातून आपल्याला समजते. असे म्हणत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
राज्यातील दुष्काळावर बोलताना त्यांनी म्हटले की, अनेक जिल्ह्यातून 90 टक्के दलित, आदिवासी, ओबीसी, भटके समूह खरिपाच्या पिकानंतर पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतर करून आपला उदरनिर्वाह करतात. यावर्षी दुष्काळामुळे सप्टेंबर महिन्यातच स्थलांतर झालंय. ज्यामुळे मोठ्या अडचणींना या समूहांना सामोरे जावे लागणार आहे.






