मंगळवेढा : मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या (२०२५) रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारकार्याला पक्षाच्या प्रमुख नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक १० (अ) मधील अधिकृत उमेदवार शहादाब अहमद रियाज अहमद कुरेशी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या भव्य जाहीर सभेत बोलताना अंजलीताई आंबेडकर यांनी मतदारांना ‘वंचित’च्या उमेदवारांना ‘गॅस सिलेंडर’ या निवडणूक चिन्हावर प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे कळकळीचे आवाहन केले.

संविधानिक मूल्यांचे महत्त्व आणि विकासाची दिशाअंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. “शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
मंगळवेढा शहराच्या विकासाची स्पष्ट दिशा मांडताना, ‘वंचित’चे नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक काम करतील यावर त्यांनी भर दिला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन प्रगती साधण्यासाठी ‘वंचित’च्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची आवाहन त्यांनी मतदारांना केले.

‘गॅस सिलेंडर’ला बटण दाबून विजयी करा: उमेदवारांचे आवाहनप्रभाग क्र. १० (अ) चे उमेदवार शहादाब अहमद रियाज अहमद कुरेशी यांनी यावेळी आवाहन केले. आपले निवडणूक चिन्ह ‘गॅस सिलेंडर’ हातात घेऊन ते म्हणाले, “मी तुमचा सेवक म्हणून काम करण्यासाठी उत्सुक आहे. गॅस सिलेंडर या निशाणीसमोरील बटण दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा.”

यावेळी कुरेशी यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे अन्य अधिकृत उमेदवार बजरंग सुभाष इंगोले (प्रभाग क्र. १० ब), सोनाली अनंत कदम (प्रभाग क्र. ११ ब) आणि फरीदिन खान फिरोज खान (प्रभाग क्र. ११ अ)) यांनीही मतदारांना संबोधित केले. सभेचे यशस्वी आयोजन आणि प्रचारात एस.एस. मनवर आणि सुनील वानखडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मतदानाची तारीख
अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारकार्याला बळ मिळाले आहे. मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान मंगळवार, दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायं ४.३० पर्यंत होणार आहे.






