अमरावती : “अमरावती शहराचा रखडलेला विकास आणि प्रलंबित मूलभूत प्रश्न केवळ वंचित बहुजन आघाडीच मार्गी लावू शकते. शहराचा कायापालट करण्यासाठी आणि सामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी तुमचे हक्काचे नगरसेवक निवडून येणे काळाची गरज आहे,” असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केले. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरमच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

शहराच्या विकासाचा नवा अजेंडा
अमरावतीतील प्रचारादरम्यान सुजात आंबेडकर यांनी थेट स्थानिक प्रश्नांना हात घातला. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीकर मूलभूत सोयी-सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छ पाणी यांसारख्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. “जर तुम्हाला प्रत्येक घराला नळ आणि प्रत्येक नळाला स्वच्छ पाणी हवे असेल, तर तुम्हाला परिवर्तनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय पक्ष नसून शोषितांच्या न्यायाचा आवाज आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

या सभेला चांदूर रेल्वेच्या नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. तरुण आणि वृद्धांच्या मोठ्या उपस्थितीमुळे आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

सुजात आंबेडकर यांच्या सभांनी अमरावतीतील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. यामुळे निवडणुकीत प्रस्थापित पक्षांसमोर वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरमने तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.






