मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे सचिन वाझे, परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला फोन टॅप प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे.या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झालीय. त्यातही ही गुप्त भेट होती मोदी-शाहांच्या गुजरातमधली. या भेटीत पवार आणि पटेल नेमके कुणाला भेटले याबद्दल राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले असतानाच खुद्द अमित शाह यानीच या भेटीबाबत आता खुलासा केल्याने राज्यातील राजकीय वातावरणात मात्र खळबळ उडाली आहे.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी गुजरातमध्ये नेमकी कुणाची गुप्त भेट घेतली? अमित शाह की गौतम अदानी? यावरून महाराष्ट्रातील पत्रकार अनेक तर्क वितर्क लावत होते.त्यावर खुद्द अमित शाह यानीच स्पष्टीकरण देऊन या तर्क वितर्काना पूर्णविराम दिला असला तरी ही बैठक नेमकी कशा संदर्भात होती? याचा खुलासा न झाल्याने महाराष्ट्रात चर्चाना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अँटिलिया- वाझे प्रकरणावरुन गदारोळ सुरु असताना शरद पवारांची पावलं गुजरातकडे का वळाली? या प्रश्नांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय.
महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीवर मागच्याच आठवड्यात दिल्लीत मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत बैठक झाली, या बैठकीस खासदार प्रफुल पेटल हे देखील उपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील भेटले होते.या बैठकीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली गेली होती,मात्र राजीनामा घेण्यात आला नाही.
या भेटीनंतर शरद पवार थेट अमित शाह ना भेटतात या मागे नेमके कारण काय? हा प्रश्न आता कळीचा बनला आहे.तसेच या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट गुप्त राहावी यासाठी ती गौतम अदानी यांच्या अहमदाबादच्या शांतीग्राम गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीची माहिती प्रसार माध्यमापासून का दडविण्यात आली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही बैठक गौतम अदानी यांच्या गेस्ट हाऊसला आयोजित असल्याने सुरुवातीला या भेटीबाबत उद्योगपतीसोबत भेट अशा बातम्या येत होत्या मात्र हळूहळू चित्र स्पष्ट होत गेले आणि त्यात भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही नाव आले.
राष्ट्रवादीकडून खंडन
राष्ट्रवादीकडून याबाबत खंडन करण्यात येत होते.शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
अमित शाह यांचे सूचक स्पष्टीकरण
सगळ्या गोष्टी सार्वजनिक केले जाऊ शकत नाही: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीच्या बातम्यांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी भेटी बाबत नकार सुद्धा दिलेला नाही.
भेटी बाबत एवढी गुप्तता का हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे
By Milind Dhumale