राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेऊन वाटचाल करणारी आजची आंबेडकरी पिढी.
आमच्यातील काही जण सामाजिक प्रश्नांवर भर देऊन सर्वांच्या हितांचे मुद्दे उपस्थित करून एकूण देशाची सामाजिक वाटचाल कशी असावी त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. तर काही जण लोककलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचून सांस्कृतिक वारसा जतन करत आहेत. काही जण राजकीय प्रतिनिधित्व असावं यासाठी राजकीय भूमिका घेऊन सर्वसमावेशक नेतृत्व उभं राहावं यासाठी लढत आहेत, तर काही जण राजकीय भूमिका घेऊ इच्छित नाहीत, कारण त्यामुळे आपली सामाजिक – सांस्कृतिक मत मांडायला मर्यादा निर्माण होतील किंवा फक्त पक्षीय राजकारणाला पूरक असेच मत मांडावे लागेल असा ते विचार करत आहेत. वेगवेगळे विचार, भूमिका असल्या तरी शेवटी आम्हा सगळ्यांचे ध्येय एकच आहे, आमच्या युगपुरुषानं पाहिलेलं स्वातंत्र्य, समता व बंधुता यावर आधारित प्रबुद्ध भारताचं मनुष्य जीवनाच्या उत्कर्षाचं स्वप्न.
पण हे फक्त इतक्या पुरतंच मर्यादित नाही आणि नसेल
आमची आजची पिढी जगाची भाषा बोलत आहे, काहीजण विविध विषयामध्ये तज्ज्ञ आहेत, ज्यांना ऐकण्यासाठी वेगवेगळ्या देशा-देशातील मोठ-मोठ्या कॉर्पोरेट्स, सरकारी संस्था, संसद भवन देखील आतुर आहेत, मानसन्मानाने निमंत्रित करत आहेत. काही जण यशस्वी उद्योजक आहेत. तर काही नितांत कुशल वकील, डॉक्टर, इंजिनिअर, पत्रकार, लेखक, कवी आहेत. या जगाला देखील नवीन भविष्य देण्याची क्षमता असणारे युवक या आंबेडकरी विचारातून निर्माण होत आहेत व होत राहतील.
प्रत्येक पिढीमध्ये आजपर्यंतच्या घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची, निर्णयांची समीक्षा वेगवेगळ्या अंगाने होत राहील, या अनुभवातून आम्ही शिकत पुढे जात राहू. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांच्या शिलेदारासाठी व त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी एक सुलभ मार्ग तयार करण्याची ही प्रक्रिया निरंतर चालूच राहील.
बाबासाहेबांनी लावलेलं अखंड मानवजातीच्या हिताचं प्रबुद्ध जीवनाचं हे रोपटं आता या खडकाळ भूमीवर मुळं धरू लागलं आहे. एक दिवस हे रोपटं भूगर्भातील लाव्हारसापर्यंत पोहचून त्याला देखील शीतलता देऊन आभाळालाही सावली धरेल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे.
विकास ओव्हाळ