नांदेड : राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. याचदरम्यान, नांदेडमधील धर्माबाद येथील एक घटना समोर आलेली आहे. नांदेडच्या धर्माबादमध्ये (Dharmabad) भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप मतदारांकडूनच करण्यात येत आहे.
आज धर्माबाद पालिकेसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलवून मतदान करू नका, असे भाजपाने सांगितल्याचा आरोप होतोय. घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाले. पण तिथे कोणताही वादविवाद होताना दिसून आला नाही. जे मतदान भाजपाला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपा करत होते अशी चर्चा सध्या सुरु आहे.
युनेस्कोमध्ये प्रथमच बाबासाहेबांचा पुतळा; जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली
अहिल्यानगरमधील कोपरगाव येथील मतदान केंद्रावर देखील गोंधळ झाल्याचं समोर आले आहे. यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे.
आरोप करत असताना उपस्थित असणाऱ्या पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले. यानंतर मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांध्येही शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आले. या सगळ्या प्रकारामुळे कोपरगावमधील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.





