अकोला : अकोला महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत चढली आहे. नगरपरिषद निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर ‘वंचित बहुजन आघाडी’ आता महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज अकोला शहरात झंझावाती प्रचार दौरा करत मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्याची सुरुवात सायंकाळी ५ वाजता प्रभाग क्रमांक १६ मधील शास्त्री नगर येथील भव्य जाहीर सभेने झाली.
एकाच दिवशी सहा विविध प्रभागांत सभांचा धडाका लावत सुजात आंबेडकरांनी प्रचारात आघाडी घेतली असून, त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

स्वच्छ व सुंदर अकोल्याचा ‘व्हीजन’
शास्त्री नगर येथील सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी प्रस्थापित राजकारणावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “अकोला शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. शहर स्वच्छ व सुंदर करणे, उत्तम आरोग्य व्यवस्था, सुरळीत स्वच्छ पाणीपुरवठा आणि सामान्य माणसाचे हक्क मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी द्या.”
महानगरपालिकेच्या सत्तेत बदल घडवण्यासाठी तरुणांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने ‘वंचित’च्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एकाच दिवशी सहा सभांचे लक्ष्य
सुजात आंबेडकर यांच्या या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच दिवसात सहा वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ते सभा आणि संवाद फेऱ्या करणार आहेत. शास्त्री नगर येथील सभेने या झंझावाताची सुरुवात झाली असून, रात्री उशिरापर्यंत शहराच्या विविध भागात या सभा सुरू राहणार आहेत. यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

या जाहीर सभेला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्यासह पक्षाचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला झालेली गर्दी पाहता, आगामी निवडणुकीत अकोल्यात वंचित बहुजन आघाडी मोठी मुसंडी मारणार असल्याचे चित्र दिसत आहे.






