शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठी बंडाळी उफाळून आली आहे. शिवसेनेतील या बंडाळी मागे भाजप नसल्याचे व्यक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
‘या बंडामागे भाजप असल्याचं अजूनतरी दिसून आलं नाही’
अजित पवार
‘एकनाथ शिंदे यांच्या बंडात अजूनतरी भाजपचा रोल दिसला नाही’
जयंत पाटील
उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना सुरतमधून गुवाहाटी येथे हलविण्यात येत असताना भाजप नेते मोहित कंबोज आणि आमदार रवींद्र चव्हाण दिसले होते. यासंबंधी बातम्या सर्वच प्रमुख प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या ज्यावरून एकनाथ शिंदेच्या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्टपणे कळते. बंडामागे भाजप असल्याचे दिसत असतानाही राष्ट्रवादी कडून भाजपची पाठराखण का करण्यात येत आहे असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.
अजित पवार यांनी भल्यापहाटे देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केले होते तर जयंत पाटील यांचे भाजप समर्थक असलेल्या भिडे गुरुजींशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत. पवार आणि पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यातून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीची पायाभरणी तर होत नाही आहे? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे, असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय चरित्र विश्वासार्हय नाही या नेहमीच्या आरोपावर शिक्कामोर्तब होईल.