ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली भेट
लातूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लातूर येथील ऑनर किलिंगचा बळी ठरलेल्या माऊली सोट यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, तसेच माऊलीला न्याय देण्याचे आश्वासन त्यांनी सोट कुटुंबियांना दिले.
भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, माऊली सोट यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे झाला आहे. त्यांचे पॅथलोजिकल फॉरेन्सिक उपयोगाचे नव्हते, तर क्लिनिकल फॉरेन्सिक करणे गरजेचे होते. हाडाला, नसांना किंवा अन्य शरीराच्या अवयवांना मार लागलाय का याबाबत क्लिनिकल फॉरेन्सिक मधून समजते. पोलीस अधीक्षकांना मी विनंती केली आहे की, आता माऊली यांचा अंत्यविधी झाला आहे. पण पोस्टमार्टम फोटोग्राफ वरून क्लिनिकल फॉरेन्सिक करता आले तर पहावे.महाराष्ट्रात हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये जी ऑनर किलिंगची पध्दत आहे ती आली आहे. याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध करावा अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
लातूर पोलीस अधीक्षकांना टेलिफोनवर सुद्धा बोललो आणि आज प्रत्यक्षात भेटलो. त्यांनी सुद्धा सोट यांची हत्या ऑनर किलिंग आहे हे मान्य केले. कायदेशीर आपल्याला जे करायचं आहे ते करायला सुरुवात झाली असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.
आज आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे सांगितले. त्यामुळे बाळासाहेबचं आम्हाला न्याय मिळवून देतील, असा विश्वास सोट कुटुंबियांनी व्यक्त केला.