२०१९ मार्चपासून जगात आणि भारतात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आणि एक वर्षापूर्वी २४ मार्च, २०२० पासून कोणताही विचार न करता “लॉकडाऊन लादण्यात आला. जगाच्या बातम्या वाचून लादलेले हे आततायी पाऊल होते. या उलट, मागील दोन-तीन दशकांत भारतात अशा व यापेक्षा भयावह रोगांच्या विशेषत: कॉलरा-पटकी, देवी, टि.बी., प्लेग. इ. रोगांच्या साथी आल्याचे दिसते. यावर सार्वजनिक मालकीच्या-सरकारी मालकीच्या विशेषत: मुंबईच्या “हाफकीन” सारख्या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांच्या अथक मेहेनतीमुळे या साथींना त्यांना रोखण्याचे यशस्वी प्रयत्नही झाले. आज देवी, पटकी, प्लेग सारखे आजार ऐकूही येत नाहीत. याचे सारे श्रेय संशोधकांना जाते. जनतेची साथही होतीच.
पण त्यावेळी “सारे मानवी व्यवहार” बंद करून ’घरीच बसा’ असे “उफराटे-अजब” उपाय केल्याचे दिसत नाही. आता सारखी जनसंपर्काची कोणतीच माध्यमं नसताना केवळ शासन-प्रशासनाचे उपाय, लोकांचा डोळस सक्रिय सहभाग आणि फारशी न शिकलेल्या जनतेची स्वयंशिस्त-काळजी यासारख्या उपायांमुळेच या सर्वांवर यशस्वीपणे मात केलेली दिसते. त्यावेळी कमालीची सामाजिक बांधिलकी व स्वयंप्रेरणेने प्लेगसारख्या साथीत काम करताना ,तर आमच्या समता व शिक्षणाच्या प्रेरणादात्या सावित्रीबाई जोतीबा फुले आणि त्यांचा एकुलता एक दत्तक डॉक्टर यशवंतला मृत्यूही आला. हे कधीही भरून न येणारे नुकसान होते.
मग ,आता तर विकसित विज्ञान-तंत्रज्ञान, मजबूत आर्थिक-राजकीय-जनसंपर्क व्यवस्था आणि ’सारे जग मुठ्ठिमें’ म्हणणा-यांची ’नफेखोर-लुटारू’ साथ असताना, भारतात “कोविड-१९” ने एवढे थैमान का घातले? भारतात तर १०% च्या आत; त्यातही अतिगंभीर व मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण २ ते ५ % च्या मध्ये दिसते. यात ’कोरोना’ व्यतिरिक्त अन्य गंभीर आणि स्थिरावलेल्या आजाराने गेलेल्यांची संख्या सरकार सांगतच नाही. आणि शेतकरी आत्महत्या कुठे गायब झाल्या पत्ताच नाही. ही कोरोनाची कृपाच मानायची का? कोरोनावर मात करण्याचा हुकमी उपाय काय तर “लॉकडाऊन-सारे बंद-कर्फ्यु, उत्पन्नाचे सारे व्यवहार बंद! पोट-भूक बंद!! केवळ घरी बसा व काळजी घ्या!” यातून नव्या संवाद-संपर्क माध्यमांचा पसारा वाढवला गेला. एखादे चॅनल सोडल्यास सारी माध्यमं ’मुठीत!’ आधीच “शोध पत्रकारिता” मारून टाकली गेलीय. आता फक्त पोपटपंची! शिस्तबध्द संघाची दहशत! खाजगीकरणाची बुलेट ट्रेन अतिवेगाने धावायला लागली आहे. तिही कॉंग्रेसनेच सुरू केलेल्या महामार्गावरून व काही ठिकाणी शेजारच्या ’समृद्धी’ मार्गाने! या सर्वांच्या बातम्या येत असतानाच कोरोना संदर्भातील आकड्यांवरून खूपच उलट सुलट बातम्याही येताहेत. त्यांची समाधानकारक उत्तरे-माहिती केंद्र वा राज्य सरकार देत नाही. किंबहुना त्यामागे खूप मोठे “राजकारण” आहे. त्यामुळे लसीसह अनेक समज-गैरसमज पसरत आहेत. याबाबत मोजकेच डॉक्टर्स या प्रश्नांची योग्य मांडणी करताहेत. खाजगी-मल्टिस्पेशियालिटी हॉस्पिटल्स, मधले दलाल-कंत्राटदार, काळा बाजारवाले, छुपे डिजीटल हॅकर्स-बदमाश, आदी सा-यांनी जेवढे सामान्य माणसांना लुटता येईल; तेवढे लुटत चालले आहेत. यावर नियंत्रण आणण्याची ना केंद्र वा न राज्याची राजकीय इच्छाशक्ती! कारण सा-यांचीची ’अंदरकी बात है.’ बॅका लुटून सारे “राष्ट्रवादी (?)” परदेशी उडून जात आहेत!
मागील सात वर्षाच्या काळात त्यांची चुकलेली “नोटाबंदी”, स्वच्छता अभियान, स्टार्ट-अप सारख्या योजना, शेतकरी आंदोलनं, विद्यार्थ्यांची बेहाल परिस्थिती- ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा, आदी आर्थिक-सामाजिक-राजकीय धोरणे, मुस्लीम, दलित, स्त्रियांसह विविध समूहांवर चालू असलेले क्रूर अत्याचार किंबहुना कत्तल, शेतकरी आंदोलनांसह सा-यांना चिरडणारी धोरणे, इ. सारे अपयश लपविण्यासाठी ’कोरोना साथ आणि लॉकडाऊन’ हे हुकमी गणित संघ-भाजप, महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवून टाकले आहे. यात सर्वाधिक मारला गेलाय तो हातावर पोट असलेला कोट्यवधी वंचित जनसमूह. ऑनलाईन शिक्षणाने तर हा समूह आणि ग्रामीण-डोंगराळ भागातील आदिवासी-भटका –शेतमजूर, स्थलांतरित मजूर पार ठेचला गेला आहे. लेकरांचे एक वर्ष वाया गेले आहे. कदाचित एक पिढीच बरबाद केली जाईल ,अशी भीती निर्माण झाली आहे. तेरा महिन्यानंतरही “लॉकडाऊनला” कोणतेच सरकार यावर योग्य व परिणामकारक उपाय काढू शकलेले नाही. त्या सर्वांची “हाक ना बोंब”! या विरुध्द राज्यघटनेच्या अहिंसक मार्गाने आंदोलन करणारे; बोलणा-यांवर प्रचंड बंधने आणली जात आहेत. यासाठी ’देशद्रोही’ शब्दाचा ’संघीय’ अर्थ लावला गेला आहे. ’सारे संघाच्या मुठ्ठीमे’ केले जात आहे. सारे आपापली सरकारे केवळ ’मजबूत करण्यात-वाचविण्यात’ व एकमेकांची उणी-धुणी धुण्यात गुंतली आहेत. “आम्ही तुमची आणि तुम्ही आमची सारी प्रकरणे बाहेर काढू” या खो-खोच्या खेळात अडकले आहेत!
देशातील न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी अहवाल म्हणतो,” माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आल्याचा मुद्दा येथे उपस्थित करण्यात आलाय. “सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने अधिक निर्णय दिले. तसेच सरकारच्या राजकीय हेतूच्या विरोधात निकाल दिल्यानंतर न्यायमूर्तींची बदली करण्यात आली.”
महाराष्ट्राचे माजी ’डिजीपी’ जुलियस रिबेरो यांनी तर, “——मी कॉंग्रेसचा माणूस नाही. नाही त्यांचा प्रचारक.” असे निक्षून सांगत, “मी एक स्वतंत्र मतदार” म्हणून मोदींच्या भूमिका व धोरणांवर जोरदार आक्षेप घेतले आहेत.”
स्विडनच्या “डेमॉक्रेटीक रिपोर्ट” मध्ये तर, “—भारत पाकिस्तानसारख्या निरंकुश सत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे” असे म्हटले आहे. तसेच “बांगला देशापेक्षाही भारतातील वाईट परिस्थिती” असल्याचेही नमूद केले आहे.
१९७५-७६ मध्ये मस्तवाल कॉंग्रेसच्या अशाच वागलेल्या तत्कालीन पंतप्रधान श्रिमती इंदिरा गांधी यांच्या ’आणीबाणी’ विरुध्द लोकशाहीच्या बाजूने लढलेल्या संघ सोडून सर्व पुरोगाम्यांनी त्यांची “आणीबाणी परवडली” अशी ओरड सुरू केली आहे. आणि मोदी राजवटीविरुध्द सोशल मीडियातून बोंब मारत आहेत. काहींनी तर त्यावेळी संघ बदलल्याचे प्रमाणपत्रही दिले होते! (यात एकही आंबेडकरवादी नाही) या समूहाला कोट्यवधी वंचित जनसमूहांच्या जीवनाचे काहीही वाटत नाही. त्यांची माफी असेच मागून बोलावे लागतेय. हुकूमशाही-निरंकुशता कुणाच्याही नावाने असू द्या; त्यांना समता, लोकशाहीवादी फुले-आंबेडकरवाद्यांचा शेवटपर्यंत विरोधच आहे. कोण काठीने ठार करतो; तर कोण लोखंडी सळीने तर कोण पिस्तुलाने “ मरतो तो सामान्य बहुसंख्य वंचित-बहुजन स्री-
पुरुष जनसमूहच ना?
संघ-भाजप विद्वेष, हिंसेशिवाय जिवंत राहूच शकत नाहीत. निरामय, समता व लोकशाहीच्या वातावरणात ते कामच करू शकत नाहीत! भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १९२० पर्यंत दिसत नसलेली संघ शक्ती निर्धास्त होत्या. पण ,त्यानंतर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय पटलावर आगमन झाले आणि त्यांनी पूर्वास्पृश्य समूह, वंचित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य लढ्यात आणले. एवढेच नाही ,तर बाबासाहेबांनी पूर्वास्पृश्य समूहासह सा-या वंचित-बहुजन समूहाला आवाहन करत मनुस्मृतीलाचा उघड आव्हानच दिले. त्यामुळे स्वातंत्र्य लढा अधिक समृध्द बनू लागला. आणि तोच मुख्यप्रवाह बनला. परिणामी “अहंम ब्रम्हास्मी-आम्हीच प्रमुख-आम्हालाच सारे कळते” या हजारो वर्षांच्या मानसिकतेमधील काही मोजके अपवाद करून ’जन्मानेच पवित्र-हुशार, बुद्धिमान’ असल्याचा दावा करणारा सारा ब्राह्मण समूह कमालीचा बेचैन झाला. त्याला त्याच्या अस्तित्वालाच धोका असल्याचे जाणवले. म्हणून त्यांनी १९२५ साली “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” स्थापन केला. “ब्राह्मणी-हिंसक-विद्वेषी राष्ट्रवाद” मानत त्यांनी “आम्ही हिंदू” हा भूलभुलैय्या निर्माण केला. त्याला सर्व पक्ष-संघटनांचे पुरोगामी ब्राह्मण नेतृत्व व कॉंग्रेस काहीही करू शकली नाही. ना त्याला रोखू शकली. त्याचा पुरेपूर गैरफायदा त्यांच्याच राजवटीत संघाने घेतला. आज त्यांच्याकडे झुकलेला बहुजन समाज या पुरोगाम्यांकडे कधी गेलाच नाही. ते त्यांचे पारंपरिक नेतृत्व सोडून वंचित, बहुजनांकडे द्यायला तयारच नाहीत. उलट ,ते या मोठ्या समूहाने त्यांच्याच मागे यावे ,असेच सांगत बसले. सर्व मित्रांची माफी मागून म्हणेन पुरोगामी ब्राह्मण समूहाची ही सर्वांत मोठी घोडचूक आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा सहकारी म्हणून एवढेच म्हणेन कर्मवीर दादासाहेब गायकवाडानंतर वंचित, बहुजन समाजाला सोबत घ्यायचा सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न ’फक्त आणि फक्त’ बाळासाहेबच करत आहेत. आणि त्यांना सावकाश का होईना यशही येत आहे. बहुजनातील छोटा ओबिसी-बार बलुतेदार फुले-आंबेडकरी मुख्य प्रवाहात सामील होत आहे. त्याच्या भाषेत स्वत:च्या समाजाला समजावून सांगत आहे. परंतु, त्यांनाही रोखायच्या कॉंग्रेसी डावात हेच पुरोगामी पक्ष-संघटना-व्यक्ती सहभागी होत आहेत हे खेदाने म्हणावे लागते. आणि म्हणून त्याचे भयावह परिणाम आज सारे भोगत आहोत. खूप जबाबदारी व गांभिर्याने बोलत आहे; बहुजन समूहाला संघाच्या छावणीत ढकलायची जबाबदारी याच पुरोगामी वर्तुळाने स्वीकारायला हवी. तसेच उर्वरित रिपब्लिकन पक्ष-संघटनाही यात मागे नाहीत हेही नमूद करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राम मनोहर लोहिया एकत्र येण्याची मनशा व्यक्त झाली असताना यांचा महाप्रवाह का झाला नाही? तो पुढे का घेवून गेले नाहीत? याला तत्कालीन दोन्हीकडचे नेते जबाबदार आहेत.
संघ प्रथमपासूनच लोकशाही मानत नाही; म्हणून राज्यघटनाही मानत नाही. त्यामुळे त्यांनी नोंदणी केलीच नाही. शस्त्रास्त्रे पूजन करणे; ती सर्रास वापरणे; दहशत निर्माण करणे; त्यांना आव्हान देणा-यांचा विविध मार्गांनी काटा; इ. त्यांची वैशिष्ट्ये आहेत. हिंसेवर त्यांची श्रध्दा आहे. किंबहुना लोकमान्य टिळकांचे निधन व गांधी –आंबेडकर यांच्या चळवळीने हैराण झालेला संघ नंतर आंबेडकरांचे धर्मांतर, बौध्द धम्म स्वीकृती आणि राज्यघटना या प्रत्येक वेळेला ते प्रचंड असुरक्षिततेच्या मानसिकतेत गेले. त्यामुळे त्यांनी त्यांची मूळ भूमिका कायम ठेवून ’पवित्रे-डावपेच’ बदलायला सुरुवात केली. मुळात तो महिला, दलित, वंचित, हिंदू बहुजन, मुस्लीम बौध्द समूहांना घाबरू लागला. पण ,त्याला ते दाखवायचे नव्हते. म्हणून हा संघाकडचा मूळ गाभा ’अत्यल्प समूह’ हिंसेकडे अधिक वळला.
वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ’समता सैनिक दला” च्या शिस्तीच्या कवायती व त्यांची बॉडी लॅंग्वेज ही कधीच, कुणाला भीतिदायक वाटत नाही. किंबहुना स.सै.दल वंचित, बहुजन, स्त्री-पु रुषांना ’सुरक्षिततेची’ हमी देते. ते स्वत: कधीच ’असुरक्षित नसतात.
नेमकी या उलट संघाची भूमिका, वागणे; भाषा, मानसिकता व बॉडी लॅंग्वेज आहे. म्हणून त्यांनी सतत त्यांचा इतिहासाचा अन्वयार्थ “क्षत्रियत्व-ब्राह्मणत्व” ला खतपाणी देणाराच लिहिला, सांगितला. कारण त्यांना नेहमी बुध्द, जैन, लिंगायत, कबीर-सूफी-वारकरी संप्रदाय जोतीराव-बाबासाहेब-गाडगेबाबा, आदी समतावादी, लोकशाहीवादी परंपरेतील प्रवाहांची भीती वाटत राहिली. म्हणून संघ विविध संघटना, रूपं घेवून, फसवी नाव घेवून वावरतो. राष्ट्रवादाच्या नावाने तरुणांना बहकवतो. भावनेच्या महासागरात पोहायला लावतो. लोकशाही म्हणजे विविध जनसमूह. त्यांची स्वातंत्र्य, स्नेहभाव, समतावादी शक्ती. त्यांची मोट कुणी बांधू नये म्हणून सतत “ब्राह्मण-क्षत्रिय” युती कार्यरत रहाते. ती लोकशाहीवादी शक्तींना वाढूच देत नाही. सत्तेच्या आसपास येवू नये याची काळजी घेतात. आता तर त्यांना वाचवायला कोरोना-लॉकडाऊन आला आहे! आधीच एकचालकानुवर्ती रा.स्व.संघ आणि लोकशाही, समता, अहिंसा यांच्यात ३६ चा आकडा आहे. कडाडून विरोध आहे. म्हणूनच जगाच्या दृष्टीने संघाचे सरकार व त्यांचे नरेंद्र मोदी आता हळूहळू मनातून उतरायला लागले आहेत! समता, अहिंसा व लोकशाहीची ही चिरंतन शक्ती, महत्त्वआहे!!