रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई करत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील एक वर्ग-१ अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकाऱ्यासह एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी वगळण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती, ज्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
दापोली पंचायत समितीतील एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याच्या कार्यालयाचे २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांचे लेखापरीक्षण करण्यात आले होते. या अहवालात २१ त्रुटी (मुद्दे) आढळून आल्या होत्या. या मुद्द्यांची पूर्तता करून तक्रारदाराने ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपालन अहवाल सादर केला.
हा अहवाल अंतिम करण्यासाठी स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव यांनी त्यांच्या कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी मार्फत २४ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने याविरोधात ११ सप्टेंबर २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
एसीबीचा सापळा
एसीबीने तात्काळ या तक्रारीची पडताळणी केली. वाटाघाटीनंतर लाचेची रक्कम २४,००० रुपयांवरून १६,५०० रुपये निश्चित करण्यात आली. गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी ७:४६ वाजता एसीबीने स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात सापळा रचला.यावेळी, शरद जाधव यांच्या संमतीने सतेज घवाळीने तक्रारदाराकडून १६,५०० रुपये स्वीकारले आणि लगेचच ती रक्कम जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये यांच्याकडे सोपवली.
हा सर्व प्रकार एसीबीच्या पथकाने पाहिला आणि तिघांनाही जागेवरच ताब्यात घेतले.या कारवाईमुळे रत्नागिरीतील शासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. रात्री उशिरापर्यंत तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.