आर्थिक अडचणीमुळे शहरातील त्रस्त विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात
औरंगाबाद : मराठा आंदोलन तीव्र झाल्यानंतर राज्य सरकारने सारथीअंतर्गत राबवलेल्या योजनांचे बॅनर शहरात लावले. दुसरीकडे मात्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या गटातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी देण्यात येणारी संशोधक विद्यार्थ्यांसाठीची सारथीची फेलोशिप दोन वर्षांपासून मिळालेली नाही. तसेच मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महोत्योतीअंतर्गत समान विद्यार्थी समान धोरणाच्या नावाखाली ऑनलाइन प्रशिक्षण देण्याच्या कारणावरून विद्यावेतन बंद केले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी त्रस्त असल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
२०१९ ते २०२३ पर्यंत ३,०७८ विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ५० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी फेलोशिप दिल्याचे म्हटले आहे. पुरेसे मनुष्यबळ आणि निधीचा अभाव असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. ते उपलब्ध करुन द्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. २०२३ पासून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी या फेलोशिपच्या प्रतीक्षेत असून यासाठी पुण्यात आंदोलन सुरू आहे.
ही विद्यार्थ्यांची अडवणूक
एका बाजूला शासन घोषणा करत आश्वासन देते. पण प्रत्यक्षात निधी कमी करत आहे. महाज्योती, सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप न मिळणे अडचणीचे आहे. आधीच मार्गदर्शकांची संख्या कमी झाली आहे. संशोधनासाठी विद्यार्थी कमी येत आहे. हे म्हणजे विद्यार्थ्यांना संशोधनापासून, विकासापासून रोखण्याचा हा प्रकार आहे.
- प्रा. मारुती तेगमपुरे, सचिव, बामुक्टो.