चंदीगड : पंजाबमध्ये आलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले असून, राज्यातील २३ जिल्ह्यांमधील २० लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. पुरामुळे आतापर्यंत ४८ लोकांचा बळी गेला असून, तीन व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. अनेक गावांमध्ये पूरस्थिती गंभीर असल्याने ३.८७ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.
तटबंधांच्या दुरुस्तीसाठी लष्कर व NDRFची मदत
पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी ‘धुस्सी’ बंधारे (तटबंध) तुटले आहेत. त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू असून, यासाठी भारतीय लष्कर आणि NDRF (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ची पथके दिवसरात्र काम करत आहेत. शेतीचेही अतोनात नुकसान झाले असून, राज्यात एकूण १,७६,९८० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू; विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची
पूरस्थितीमुळे बंद असलेल्या राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, पॉलिटेक्निक आणि आयटीआय ८ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होत आहेत. शिक्षणमंत्री हरजोत बैंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागांमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक जिल्हाधिकारी घेऊ शकतील.
सरकारी शाळांमध्ये सोमवारी फक्त शिक्षक उपस्थित राहून नुकसानीचा आढावा घेतील, तर विद्यार्थी ९ सप्टेंबरपासून शाळेत जातील. खासगी शाळा मात्र सोमवारपासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू होतील. शाळा व्यवस्थापनाला त्यांच्या इमारतींच्या आणि वर्गखोल्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी लागेल.
अमृतसरमधील १७५ शाळांना पुराचा फटका
पुरामुळे शिक्षण क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. एकट्या अमृतसर जिल्ह्यात १७५ सरकारी शाळांच्या इमारती आणि फर्निचरला ५४ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अनेक शाळांच्या भिंती कोसळल्या असून, आतील साहित्य पूर्णपणे खराब झाले आहे.
जिल्हा शिक्षण अधिकारी राजेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोपोके, अजनाला आणि रमदास यांसारख्या भागांतील शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर नुकसानीचा अंतिम अंदाज काढला जाईल. प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.