विरार : विरारमधील नारंगी फाटा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामू कंपाऊंडच्या स्वामी समर्थ नगरमधील चार मजली ‘रमाबाई अपार्टमेंट’ नावाच्या इमारतीचा एक भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना मंगळवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (NDRF) आणि वसई विरार शहर महानगरपालिकेची अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचली. आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी श्वानपथकाची (dog squad) मदत घेतली जात आहे.
मात्र, अरुंद रस्ते आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मोठ्या प्रमाणात ढिगारे हटवण्यासाठी जेसीबीसारखी मोठी यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचू शकत नाहीये. यामुळे ढिगारे हातानेच काढावे लागत आहेत.
चिमुरडीचा होता पहिला वाढदिवस, काळाने घात केला, आईचा मृत्यू, वडील बेपत्ता
या दुर्दैवी घटनेत एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याच इमारतीत राहणाऱ्या जोयल कुटुंबातील एका चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तिचे काही मित्र-मैत्रिणीही आले होते. इमारतीचा भाग कोसळल्याने वाढदिवस साजरा करत असलेल्या चिमुकलीचा आणि तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिचे वडील, ओमकार जोयल, अजूनही बेपत्ता आहेत. याशिवाय, याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर (44), त्यांची पत्नी सुपरीला निवळकर (40) आणि मुलगा अर्णव निवळकर (14) हे तिघेही बेपत्ता आहेत.
इमारत 10 वर्षांपूर्वीची, नोटीस देऊनही दुर्लक्ष
मिळालेल्या माहितीनुसार, ‘रमाबाई अपार्टमेंट’ ही इमारत सुमारे 10 वर्षे जुनी आहे. महापालिकेने इमारतीचे ऑडिट करण्याची नोटीस दिली होती, परंतु त्यावर काहीही कार्यवाही झाली नसल्याचे समोर आले आहे. ही घटना घडल्यानंतर आता संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. सध्या बचावकार्य वेगाने सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.