संजीव चांदोरकर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या फुग्यात हवा तर भरली जात आहे हे नक्की. हा फुगा हवेत उंच उंच जाईल की मध्येच फुटेल ? असा प्रश्न विचारण्याचे कारण की मागच्या आठवड्यात अमेरिकेतील टेक्नॉलॉजी स्टॉक्स खाली आले आहेत. सर्व टेक स्टॉक्सचे मिळून एकूण जवळपास एक ट्रिलियन डॉलर्स बाजार मूल्य कमी झाले आहे.
अल्फाबेट, ॲमेझॉन, ॲपल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिआ आणि टेस्ला या सात टेक कंपन्यांना अमेरिकेत “मॅग्नीफिसंट सेवन” म्हटले जाते. या सातही कंपन्यांचे शेअर्स कमकुवत होत आहेत.
याला कारण ठरले एमआयटी विश्वविद्यालयाचा एआय उद्योगावरचा एक अहवाल. ज्यात म्हटले गेले आहे की ९५ टक्के ए आय कंपन्यांना त्यांच्या गुंतवणुकीवरून शून्य टक्के परतावा मिळत आहे.
अपेक्षेप्रमाणे मीडियामध्ये २००० सालातील डॉट कॉम कंपन्यांचा फुगा फुटण्याच्या चर्चा आणि तुलना होत आहेत. शेअर मार्केटमध्ये कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाबद्दल अशा पद्धतीची हवा नेहमीच बनत असते. बनवली जात असते. (शेअर्स वेगाने वर जाऊन वेगाने खाली येण्यात नक्की कोण पैसे मिळवते याचा जमला तर विचार करा)
प्रत्येक गुंतवणूकदाराला, म्युच्युअल फंडाला, अनेक संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्याच त्या मूठभर टॉपच्या कंपन्यांमध्ये शेअर्स हवे असतात. त्यामुळे त्या मुठभर कंपन्यांचे शेअर्स पतंग बदवल्याप्रमाणे हवेत उंच उंच जात राहतात. त्यांचे बाजारमूल्य अतार्किक पातळीवर पोहोचते. याला “ऍसेट बबल” असे म्हणतात. जे अमेरिकेत आज घडत आहे. वर उल्लेख केलेल्या “मॅग्नेफिसंट सेवन” या फक्त सात कंपन्यांचे बाजार मूल्य अमेरिकेतील एकूण बाजार मूल्याच्या ४० टक्के आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपन्या सॉफ्टवेअर कंपन्या नव्हेत. त्या “ॲसेट हेवी”, म्हणजे प्रचंड भांडवल सघन आहेत.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर तेव्हाच वाढू शकतो जेव्हा कनेक्टिव्हिटी, डेटा सेंटर्स, त्यांना लागणारी वीजनिर्मिती, कुलिंग इत्यादीसाठी अब्जावधी डॉलर्स गुंतवून इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जाईल. फक्त चार मोठ्या ए आय कंपन्या यावर्षी ७०० बिलियन डॉलर्स भांडवली गुंतवणूक करणार आहेत. पुढच्या पाच वर्षात हा आकडा ३००० बिलियन डॉलर्स पर्यंत जाणार आहे. तुलनेसाठी. म्हणजे भारताच्या जीडीपीच्या ८० टक्के. किंवा भारताचा वार्षिक अर्थसंकल्प ५०० बिलियन डॉलर्सचा असतो.
एवढ्या महाकाय भांडवली गुंतवणुकीवर परतावा नक्की कधी मिळणार आणि किती मिळणार हे प्रश्न वेगाने पुढे येत आहेत. एमआयटीचा अहवाल आणि निष्कर्ष त्यातूनच तयार झाला आहे.
बघू काय काय होणार आहे ते…
कॉर्पोरेट आणि वित्तभांडवलच्या डीएनए मध्ये अराजकवाद भिनलेला आहे. फक्त प्रवर्तकांचेच भांडवल दरीत कोसळले तर चिंता करण्याचे कारण नव्हते. त्यांचं ते बघून घेतील.
पण या कंपन्या कोसळताना देशांच्या, जगाच्या अर्थव्यवस्थांना, बँकांना, भांडवली बाजारांना, रिटेल गुंतवणूकदारांना देखील घेऊन कोसळतात. त्यातून बाहेर यायला अनेक वर्ष जातात. मधल्या काळात कोट्यावधी सामान्य नागरिकांच्या हालापेक्षा वाढतात. म्हणून तो आपला अभ्यासाचा विषय असला पाहिजे.
अजून एक. अमेरिकेत काय सुरू असते याची आपण दखल का घ्यावी ? कारण एकूणच भारतीय अर्थव्यवस्था, बँकिग, वित्त क्षेत्र, भांडवली बाजार अमेरिकन मॉडेलवरच उभा केला जात आहे म्हणून.