नागपूर : हिंगणा-म्हैसपूर येथील सुमारे ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जयराम गोरक्षण आणि चॅरिटेबल ट्रस्टवर प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोरक्षणाच्या शेड, जनावरांचे खाद्य साठवण्याचे गोदाम आणि कामगारांची घरे पाडण्यात आली. विशेष म्हणजे, २००७ पासून उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा कोणतीही पूर्वसूचना न देता हटवण्यात आला. पुतळा कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहे, याची माहिती प्रशासनाने अद्याप दिली नाही.
ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊ अहिर यांची केस न्यायालयात प्रलंबित असतानाही ही कारवाई करण्यात आल्याने न्यायालयाचा अवमान झाल्याचा आरोप होत आहे. या कारवाईमागे राजकीय दबाव असण्याची शक्यता वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की ही कारवाई भारतीय संविधानातील कलम ४८, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (दुरुस्ती) अधिनियम, २०१५ आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा, १९६० यांचे उल्लंघन करणारी आहे. या कायद्यांनुसार, कोणत्याही गोरक्षण संस्थेवर कारवाई करण्यापूर्वी लेखी नोटीस, पर्यायी व्यवस्था आणि न्यायालयीन परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, जयराम गोरक्षण प्रकरणात या नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या तीन मागण्या :
- ट्रस्टची मूळ जागा परत मिळावी.
- झालेल्या ₹८०-९० लाखांच्या नुकसानीची भरपाई द्यावी.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मूळ जागी तात्काळ पुनर्स्थापित करावा.
या मागण्या तीन दिवसांत मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. या मोर्च्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोरक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.