मुंबई : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमुळे (SRA) बाधित झालेल्या हजारो कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी, आज वंचित बहुजन आघाडीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) कार्यालयावर विराट मोर्चा काढला. प्रकल्प पूर्ण होण्यास होणारा विलंब, भाडे थकबाकी, मूलभूत सुविधांचा अभाव आणि बिल्डर-अधिकारी यांच्यातील संगनमताच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकल्प रखडलेले असून, त्यामुळे हजारो कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अर्धवट स्थलांतर, सोयी-सुविधांचा अभाव, आणि केवळ कागदावर राहिलेली आश्वासने यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीने SRA आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मोर्चात ३५ हून अधिक एसआरए प्रकल्पग्रस्त संघटनांचे हजारो सदस्य सहभागी झाले. यावेळी मोर्चात सामील झालेल्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या हक्कासाठी आवाज उठवला. केवळ निवेदने देऊन हा लढा थांबणार नाही, तर सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
या मोर्च्यापूर्वी नुकतीच एसआरए पीडित कुटुंबांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यावेळी नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि इतर कोणत्याही राजकीय पक्षाने या प्रकरणात मदत न केल्याची खंत व्यक्त केली. या प्रश्नावर फक्त वंचित बहुजन आघाडीच लढा देऊ शकते, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे आणि महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
- रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत. थकलेल्या भाड्याची भरपाई त्वरित द्यावी.
– गैरव्यवहार करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी.
– झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत आणि योग्य ठिकाणी करावे.
- SRA प्राधिकरणाने प्रकल्पांच्या प्रगतीची स्पष्ट माहिती जाहीर करावी.
- बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताला आळा घालावा.
- गरज पडल्यास शासनाने प्रकल्प स्वतः ताब्यात घेऊन कार्यवाही करावी.
प्रकल्पग्रस्त हे मुख्यतः गरीब आणि वंचित समाजातून आलेले असून, त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या लढ्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर विश्वास व्यक्त करत, पीडितांनी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.