नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या या बँकेत आता सर्वच पक्षांचे नेते ‘मलिदा वाटून खाण्यासाठी’ एकाच ताटात आले असल्याचा आरोप होत आहे. एकेकाळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अष्टीकर, माजी खासदार खतगावकर आणि अमर राजूरकर यांसारखे दिग्गज नेते आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकाच व्यासपीठावर आले आहेत.
सत्ताधारी कोण, विरोधक कोण? – जनतेला प्रश्न
राजकीय टीका, चारित्र्यहनन, कौटुंबिक आरोप आणि सभागृहात आरडाओरडा करणारे नेते आज अचानक एकमेकांचे ‘सखा’ बनले आहेत. यामागे नांदेड जिल्हा बँकेतील सत्ता आणि ‘मलिदा’ हेच एकमेव कारण असल्याचे बोलले जात आहे. यामुळे “सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण?” असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, या सर्वांची खरी जागा म्हणजे सत्तेच्या गोठ्यातील ‘गुऱ्हाळ’ होय. शेतकऱ्यांची बँक, त्यांचे पैसे, त्यांच्या नावे घेण्यात येणाऱ्या कर्ज योजना, प्रोत्साहन निधी, खरेदी-विक्रीची बिले, शेतमालावरील कर्ज आणि पतसंस्थांचे व्यवहार या सर्वांवर हात ठेवण्यासाठी सर्वच राजकीय मंडळी एकत्र आल्याचे स्पष्ट दिसते.
निवडणुकीच्या काळात एकमेकांना ‘भ्रष्टाचारी, गुन्हेगार, गद्दार, सावकारांचा हस्तक, दलाल’ अशी विशेषणे देणारे हेच पुढारी आता जिल्हा बँकेत एकत्र बसले आहेत. काहींनी याच बँकेतील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तर काहींनी याच मंडळींना बँकेच्या लुटीत सामील असल्याचे पुरावे सादर केले होते. मात्र, आज हे सर्व एकत्र येण्याचे एकमेव कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या बँकेतील कोट्यवधींची उलाढाल आणि भ्रष्टाचाराची वाटणी, असा आरोप जनसामान्यांमधून होत आहे.
मतदारांनी फसव्या राजकारण्यांना ओळखावे
जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून सत्ता मिळवणारे आणि नंतर त्याच जनतेच्या जीवावर ‘मलिदा’ खाणारे हे सर्व नेते एकाच माळेचे मणी आहेत. ते भाजप, काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी किंवा शिंदे-पवार गटाचे असोत, एकमेकांवर आरोप करणारे हे सर्वच एकत्र येऊन बँकेतील सत्ता बळकावत आहेत. निवडणुकीच्या वेळी हेच पुढारी मतदारांपुढे येऊन स्वच्छतेच्या आणि परिवर्तनाच्या गप्पा मारतील. मात्र, त्यांच्या आजच्या कृतीतून स्पष्ट दिसते की, ते कोणत्याही विचारांचे नाहीत, ते फक्त ‘मलिद्याचे गुलाम’ आहेत.
शेतकऱ्यांच्या नावावर सत्ता, पण शेतकऱ्यांचेच शोषण!
शेतकऱ्यांच्या विकासासाठी स्थापन झालेली सहकारी बँक सध्या सर्वपक्षीय सत्तेचा आखाडा बनली आहे. शेतकऱ्यांना बँकेतून वेळेवर कर्ज मिळत नाही, पिक विमा वेळेवर मिळत नाही, साखर कारखान्यांचे पैसे थकतात. मात्र, या बँकेच्या संचालक मंडळात बसण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक गुपचूप करार करून एकत्र येतात.
या सडलेल्या सत्ताधारी-विरोधक व्यवस्थेला झुगारून द्या!
नांदेड जिल्ह्याच्या जनतेने, मुख्यतः शेतकरी, महिला, तरुण आणि वंचित समाजाने आता या सत्तालोलूप पुढाऱ्यांच्या खोट्या नाटकांना उघडं पाडण्याची वेळ आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये हेच लोक तुमच्या दारात येऊन पुन्हा आश्वासने देतील, पण त्यांची जिल्हा बँकेतील कृती लक्षात ठेवा. लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणूक नव्हे, तर अशा कोलांटउड्या मारणाऱ्या भोंदू राजकारण्यांना मतांनी झोडपून काढणे हीच खरी लोकशाही आहे.
या सर्व ‘राजकीय किड्यांना’ राजकारणातून हाकलून लावण्यासाठी विचारी, शुद्ध, संघर्षशील आणि नवविचारांचा पर्याय उभा करणे ही काळाची गरज आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या, शोषणविरोधी आणि बँक लुटणाऱ्या टोळ्यांना रोखणाऱ्या नेतृत्वाला आता पुढे आणण्याची मागणी होत आहे.
सत्ता आणि संपत्तीची वाटणी हेच खरे उद्दिष्ट
जिल्हा बँक हे केवळ एक निमित्त आहे; सत्ता आणि संपत्ती यांची वाटणी हाच खरा हेतू आहे. हे खोटे सत्ताधारी-विरोधक एकत्र येणे ही नैतिक दिवाळखोरीची लक्षणे आहेत. या ‘लांडग्यां’पासून शेतकरी, गरीब, कामगार, तरुण आणि महिला यांनी सावध राहावे. येणाऱ्या निवडणुकीत जनतेला मूर्ख समजणाऱ्या या राजकारण्यांना योग्य धडा शिकवण्याची हीच वेळ आहे.