पुणे : लम्पी स्कीन रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी लसीकरण मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या जिल्ह्यात ९०६ पशुधनाला या आजाराची लागण झाली असून, त्यापैकी ५९१ पशुधन उपचाराने बरे झाले आहे. मात्र, १५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांमध्ये लम्पीचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत असल्याने, या भागातील संसर्ग केंद्रापासून ५ किलोमीटरच्या परिसरात लसीकरण करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे.
लम्पी स्कीन नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी सक्रिय
जिल्हाधिकारी डूडी यांनी पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले की, सध्या ३०० पशुधनावर उपचार सुरू असून, हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे. मनुष्यबळाची कमतरता असलेल्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गोठ्यांची स्वच्छता, जैवसुरक्षा आणि निर्जंतुक औषधांची फवारणी यांसारख्या उपाययोजनांवर त्यांनी भर दिला, जेणेकरून आजाराचा प्रसार रोखता येईल.
उपचारांची सोय आणि लसीकरणाची सद्यस्थिती
सध्या लम्पीचा प्रादुर्भाव सौम्य असून, बहुतांश पशुधन उपचाराने बरे होत आहे. सर्व शासकीय संस्थांमध्ये उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील ५ आणि केंद्र पुरस्कृत योजनेतील १ फिरत्या पशुचिकित्सा पथकांद्वारे पशुपालकांच्या दारात उपचार केले जात आहेत. पशुपालकांना लम्पी बाधित पशुधनावर उपचार करण्यासाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांच्या अनुभवानुसार, योग्य जैवसुरक्षा उपाययोजना, बाधित पशुधनावर तातडीने उपचार आणि अबाधित क्षेत्रात १००% लसीकरण यामुळे या आजारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यात ५.७ लाखांहून अधिक पशुधनाचे लसीकरण पूर्ण
पुणे जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार ८,४६,७४५ गोवर्गीय पशुधन आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, बाधित गाव आणि त्याच्या ५ किलोमीटर परिसरातील पशुधनाला गोट पॉक्स लसीद्वारे (उत्तरकाशी स्ट्रेन) प्रतिबंधात्मक लसीकरण केले जात आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) जिल्ह्यात एकूण ५,८०,६०० लस मात्रा वितरित करण्यात आल्या असून, आतापर्यंत ५,७०,७९१ पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
ज्या ठिकाणी आजाराचा उद्रेक दिसून येत आहे आणि ज्या पशुधनाचे लसीकरण झालेले नाही, त्यासाठी तालुकानिहाय लस मागणी घेण्यात आली असून, नवीन लस खरेदी करून पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.
नांदेड जिल्हा बँकेत सत्ताधारी-विरोधक एकत्र !
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या...
Read moreDetails