अमरावती : तिवसा येथे एका भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगासोबतच आता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिवसा पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी मोहित अशोकराव मोटघरे यांच्या विरोधात एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित युवती अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने, आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल होणे आवश्यक होते.
मात्र, स्थानिक आमदारांच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी सुरुवातीला विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी कायद्याचा समावेश केला नव्हता, असे निदर्शनास आले. हे प्रकरण वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तात्काळ तिवसा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांची भेट घेतली. आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी लावून धरली.
पीडित युवतीच्या कुटुंबाने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, आरोपी भाजप पदाधिकारी असल्याच्या बळावर तो पीडितेला वारंवार त्रास देत होता. राजकीय सत्तेचा गैरवापर करून सामान्य जनता आणि शिक्षणानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या युवतींना वेठीस धरणाऱ्या अशा लोकांना धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा होणे आवश्यक असून, त्याच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणे महत्त्वाचे आहे, अशी भूमिका सागर भवते यांनी मांडली.
सागर भवते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, तिवसा पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांनी तात्काळ नमते घेत आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्याचा समावेश करण्याचे आदेश दिले. तसेच, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे आश्वासन त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांच्यासह जिल्हा सदस्य प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, अनिल सोनोने, मुस्ताक शहा, सिद्धार्थ कटारने, सागर गोपाळे, राजकुमार आसोडे, नितीन थोरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या या प्रयत्नांमुळे पीडित युवतीला न्याय मिळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: ‘हिटलरशाहीचा उदय’, वंचित बहुजन आघाडीचा आरोप
वडवणी : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक १० जुलै २०२५ रोजी विधानसभा आणि विधान परिषदेत बहुमताने मंजूर झाल्याने, वंचित बहुजन आघाडीने या...
Read moreDetails