वाशिम – “येणारा काळ वंचित घटकांसाठी अत्यंत गंभीर असून, आता सर्व वंचित समाजाने एकत्र न आल्यास भविष्यात त्यांच्या पाठीशी कोणी उभा राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी दिला. गुरुवारी रात्री वाशिम शहरातील फंक्शन हॉलमध्ये आयोजित संवाद दौऱ्याच्या सभेत त्या बोलत होत्या.
या वेळी त्यांनी जन सुरक्षा कायद्यावर परखड भाष्य केले आणि वाशिम शहरातील अनेक मूलभूत समस्या, जसे की शासकीय शाळा बंद पडणे, रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीटंचाई, स्वच्छतागृहांची कमतरता, बुरुजी धरणाच्या उंचीवाढीचा अभाव, आदी मुद्द्यांवर प्रशासनावर जोरदार टीका केली. “प्रशासन ढिम्म आहे आणि जमीनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर शहरातील जागा बळकावल्या आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
सभेला राष्ट्रीय सचिव आणि जिल्हा निरीक्षक माजी आमदार नतिकोद्दीन खत्तीब, वाशिम विधानसभा निरीक्षक डॉ. तुषार गायकवाड, जिल्हाध्यक्ष किरणताई गिहे, महिला आघाडीच्या ज्योतीताई इंगळे, महासचिव रंगनाथ धांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सचिव खत्तीब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
डॉ. तुषार गायकवाड यांनी मुस्लिम समाजबांधवांना वंचित आघाडीसोबत येण्याचे आवाहन करताना सांगितले की, “सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता प्रस्थापित करावी.” या कार्यक्रमात मुस्लिम समाजबांधवांची उल्लेखनीय उपस्थिती होती. यावेळी अनेक पदाधिकारी, माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.वाशिम नगर परिषदेच्या मागील थेट नगराध्यक्ष निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांनी टोकाची लढत दिली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचित आघाडीची रणनीती राजकीय वर्तुळात लक्षवेधी ठरणार आहे.