खोपोली – वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत खोपोली शहर शाखेच्यावतीने 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम काल, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, विहारी, खोपोली येथे जिल्हाध्यक्ष मा. दिपकभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन खोपोली शहर सदस्य मा. मितालीताई गणेश वाघमारे आणि शहर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, शालेय वस्तू आणि पावसाळी वातावरण लक्षात घेता उपयुक्त अशा छत्र्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या यशाचा सन्मान करताना उपस्थित मान्यवरांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ गायकवाड यांच्यासह, खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव, महासचिव ॲड. आशिष मणेर, कोषाध्यक्ष कुणाल पवार, संघटक संतोष मर्चंडे, उपाध्यक्ष रोहित वाघमारे, महिला पदाधिकारी ज्योतीताई खाडे, सदस्य सुनीता घोडके, प्रवीण जाधव आणि शहरातील विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. महिलांची उपस्थितीदेखील लक्षणीय होती. या उपक्रमाद्वारे वंचित बहुजन आघाडीकडून समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. कार्यक्रमाचे संयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले असून उपस्थितांचे आभार शहर कमिटीच्यावतीने मानण्यात आले.