देशभरात मोदी विरोधात वातावरण असताना मग VBA ने वेगळं न लढता एक दोन जागेच्या बोळवणीवर MVA सोबत जायला पाहिजे. काही तरी पदरात पाडून घेतलं पाहिजे. ताठर भूमिका नको, यांचं नुकसान होतं, त्यांचा फायदा होतो, इ. इ. वरकरणी ठीक वाटणाऱ्या भूमिका घ्याव्या यासाठी VBA वर तथ्यहीन टीका करणारे विचारवंत फक्त सत्तेत येणाऱ्या लोंकांचे पक्ष बदलले आहेत, सत्तेत आज ही तिचं लोक आहेत यावर आजही चकार शब्द काढायला तयार नाहीत.
अशोक चव्हाण, अजित पवार व इ. हे कालपर्यंत पुरोगामित्वाचा घुंगट घेऊन सत्ता भोगत होते आता हिंदुत्वाचा दुपट्टा घेऊन सत्ता भोगत आहेत.भारतामध्ये सरकारे बदलतात पण रुलिंग क्लास तोच राहतो हे या महान विचारवंतांना माहित नसेल काय ? आजही निवडून आलेल्या मध्ये कोण कोणत्या जातीय-धार्मिक समूहाचे प्रतिनिधित्व करत आहेत हे दिसत नाही काय ?
पण लोकसभेला तडजोडवादी भूमिका का स्वीकारली नाही असे म्हणून हे स्वयं घोषित, तथाकथित तटस्थ VBA ला झोडपून काढायची मोहीम राबवत आहेत. त्यामध्ये मग लांबलचक बौद्धिक लेख लिहून, आकडेवारी फेकून मारून, मिळेल ते संदर्भ देऊन, काहीतरी लिहायचं म्हणून, ऑनलाइन स्कॉलर, गल्लीबोळ संघटना-राष्ट्रीय अध्यक्ष किंवा इतर काही प्रोफेशन काम करणारे काही अदखपात्र जे दखल घेतली जावी यासाठी धडपड करू पाहतायेत. हे सगळे राजकीय सेन्स ऑफ अर्जन्सी मधून तयार केलेल्या वातावरणात लगेच बौद्धिक शीघ्रपतन करणारे चंचल विचारवंत आहेत.. किंवा इतर पक्षाशी संधान साधून आपल्या पदरात मिळेल ते पाडून घेऊ इच्छिणारे संधी साधू आहेत.. यांना कितपत महत्व दिलं जावं ?
एक आंबेडकरवादी राजकीय पक्ष उभा राहू पाहतोय. त्यामध्ये काही उणिवा नक्की असतील. त्या दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न न करता फक्त त्यावर तोंडसुख घेणे, ट्रोल करणे हे साप सोडून भुई धोपटण्यासारखे आहे. जर तुमच्या मध्ये क्षमता आहे तर तिचा सदुपयोग हा तुम्ही जेथून येत आहात त्या समूहाच्या सर्वागीण विकासासाठी करणार आहात कि त्यांना हिणवण्यातच तुम्ही धन्यता मानत राहणार आहात?
इथं सत्ता कधी तुमच्या घरी पाणी भरत होती ? जी गमावल्याचे दुःख तुम्ही मानत आहात ? जे काही आहे ते एक ट्रायल आणि एररचाच भाग असणार आहे. पण मग प्रयत्न करणे देखील सोडून द्यावे काय ? आपण सामूहिक प्रयत्न करणार नसू तर राजसत्तेची स्वप्न पाहण्याचा तरी आपल्याला अधिकार आहे काय ?
राजकीय भागीदारी, सामाजिक वर्चस्व, आर्थिक विषमता हे प्रश्न बाजूला ठेवून फक्त आपल्याच खुरवड्यामध्ये दोन चार दाणे पडावेत म्हणून जर आपण आपली आपसातील झुंज सार्वजनिक करणार असू तर मग आपण राजकीय परिपक्वते पासून कोसो दूर आहोत.